दि. ११ (पीसीबी) : बिहारमध्ये अत्यंत वादग्रस्त ठरत चाललेल्या मतदार पडताळणी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीवरून घेरल्यानंतर आज (11 ऑगस्ट) इंडिया आघाडीच्या 300 खासदार संसद ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. राहुल गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी खासदार सहभागी झाले. मात्र, संसदेपासून 700 मीटरवर असणाऱ्या निवडणूक आयोगाकडे जाऊ न दिल्याने महिला खासदार सुद्धा आक्रमक झाल्या. अखिलेश यादव यांनी बॅरिकेड भेदून पलीकडे उडी घेतली. महिला खासदारही बॅरिकेडवर जाऊन पलीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, एकमेकांना खेटून दोन दोन बॅरिकेड लावण्यात आली होती. समाजवादी पक्षाचे प्रमुख पहिल्यांदा अखिलेश यादव पोलिस बॅरिकेड ओलांडून गेले. त्यांना पाहून इतर काही खासदारांनीही बॅरिकेड ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला.
संतप्त झालेल्या खासदारांनी निवडणूक आयोगाने चुकीचं काही केलेलं नाही, तर कशासाठी अडवत आहात? अशी विचारणा केली. मतांवर दरोडा टाकू नका, असा हल्लाबोलही खासदारांनी केला. निदर्शने करणाऱ्या विरोधी खासदारांना पोलिसांनी परिवहन भवनात बॅरिकेड लावून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाण्यापासून रोखले. यादरम्यान खासदार वेणुगोपाल यांचा पोलिस अधिकाऱ्यांशी वादही झाला. संसदेच्या मकर द्वार येथून मोर्चा सुरू झाला. खासदारांच्या हातात ‘मत वाचवा’ असे बॅनर होते. तथापि, दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की इंडिया ब्लॉकने मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती, म्हणून मोर्चा निवडणूक आयोगापर्यंत पोहोचण्यापूर्वीच, वाहतूक भवनाजवळ बॅरिकेड्स लावून तो थांबवण्यात आला.
राज्यसभेत शून्य प्रहरात विरोधकांनी घोषणाबाजी केली. खासदार ‘मत चोरी थांबवा’ असे घोषणा देत अध्यक्षांच्या व्यासपीठाजवळ पोहोचले. त्यानंतर कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
मोर्चात सहभागी झालेले काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की,-माझ्यासाठी हा मुद्दा खूप सोपा आहे. राहुल गांधींनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यांची उत्तरे दिली पाहिजेत. निवडणूक आयोगाची केवळ देशाप्रती जबाबदारी नाही, तर आपल्या निवडणुकांच्या विश्वासार्हतेबद्दल लोकांच्या मनात शंका नसावी ही त्यांची स्वतःची जबाबदारी देखील आहे. निवडणुका संपूर्ण देशासाठी महत्त्वाच्या आहेत. आपली लोकशाही इतकी मौल्यवान आहे की डुप्लिकेट मतदान, अनेक पत्ते किंवा बनावट मते आहेत की नाही याबद्दल शंका घेऊन ती धोक्यात आणता येणार नाही. जर लोकांच्या मनात काही शंका असतील तर त्या दूर केल्या पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरे उपलब्ध असू शकतात, परंतु ही उत्तरे विश्वासार्ह असली पाहिजेत. माझी एकच विनंती आहे की निवडणूक आयोगाने हे प्रश्न हाती घ्यावेत आणि त्यांचे निराकरण करावे.