नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – लोकसभा निवडणूक येत्या आठवड्यात जाहीर होऊ शकते त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. मात्र त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अरूण गोयल यांनी दिलेला हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.दरम्यान, गोयल यांच्या राजीनाम्यामुळे देशात खळबळ आहे, परंतु नेमक्या कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला ते गुलदस्त्यात आहे.
निवडणूक आयोगात आधीच निवडणूक आयुक्त हे एक पद रिक्त होतं. निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यावर्षी फेब्रुवारीमध्ये निवृत्त झाले होते. गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडेच पदभार आहे. निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्ताशिवाय इतर दोन आयुक्त असतात. आधी एक पद रिक्त होतं त्यानंतर आता अरूण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ही दोन्ही पदं रिक्त झाली आहेत.










































