निवडणुकित जरांगे पॅटर्न फेल, ओबीसींचे ४५ आमदार विजयी

0
44

मुंबई, दि. 27 (पीसीबी) : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला २८८ पैकी तब्बल २३७ जागांवर विजय मिळाला. त्यामध्ये, भाजपने सर्वाधिक १३२ जागा मिळवत देदीप्यमान यश प्राप्त केलं आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीत काम करणारा जरांगे पॅटर्न विधानसभा निवडणुकीत फेल गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, आम्ही मैदानातच नव्हतो, ज्याला पाडायचंय त्याला पाडा, असं मी मराठा समाजाला सांगितलं होतं. त्यामुळे, जरांगे पॅटर्न फेल झाला ह्या चर्चेला काहीही अर्थ नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र, निकालानंतही ओबीसी व मराठा हा वाद पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचे सर्वाधिक आमदार आल्याचे सांगत मराठा समाजाशिवाय महाराष्ट्रात काहीही होऊ शकत नाही, असे म्हटले. तर, राज्यभरातील ओबीसी एकवटल्यामुळेच महायुतीला एवढं यश मिळाल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. तसेच, राज्यात ४५ पेक्षा जास्त ओबीसी आमदार विजयी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातले जातीयवादाचे विष मराठा आणि बहुजन समाजाने संपवत चांगला निकाल दिला आहे, राज्यातील विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल झाला. आता, यापुढे जरांगेंच्या आंदोलनाला प्रति आंदोलन होणार नाही, याउलट ओबीसीच्या प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी संघटना बांधणार असल्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली. ओबीसी आंदोलनाचा फायदा यावेळी निवडणुकीत दिसून आला असून 45 पेक्षा जास्त ओबीसी आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे, मला सत्तेतलं कोणतेही पद नको असून मी मंत्रिपदाबद्दल केलेले वक्तव्य उपहासातून होते, असे स्पष्टीकरणही हाके यांनी दिलंय. ज्यांनी जरांगेंना उपोषणाला आणून बसवले त्यांना मनी, मीडिया अशा सर्व गोष्टींची मदत केली, ती मंडळी या निकालामुळे नाउमेद झाल्याची टीकाही हाके यांनी नाव न घेता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली.

जरांगेंना महिला आयोगाने नोटीस बजावावी
पत्रकारांसमोर शिव्या देणं हे कुठल्या संस्कृतीत बसतं. एका पत्रकार परिषदेत त्यांनी मला 15 वेळा आईवरुन शिवी दिलीय. त्यामुळे, माझी महिला आयोगाला विनंती आहे की, त्यांनी सातत्याने महिलांचा अवमान करणाऱ्या मनाज जरांगेंना नोटीस पाठवावी, अशी मागणीही लक्ष्मण हाके यांनी केली आहे.