निवडणुका झाल्यास भाजपचा धुव्वा उडेल, माजी मुख्यमंत्र्यांचा विश्वास

0
326

सातारा, दि. ५ (पीसीबी) : अदानी उद्योगसमूहाचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणाची आरबीआय, सेबीने चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. केंद्र सरकारनं अदानी एके अदानी हा अजेंडा थांबवून सर्वसामान्यांसाठी योजना राबवून उद्याचा भारत निर्माण करण्यासाठी पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, राज्यात आता निवडणुका झाल्या आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढले, तर आमची एकहाती सत्ता येईल आणि भाजपचा धुव्वा उडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत जोडो यात्रा राज्यात यशस्वी झाल्यानंतर अखिल भारतीय कॉँग्रेस समितीने ‘हात से हात जोडो अभियान’चा विस्तारित कार्यक्रम दिला आहे. या अभियानाचा प्रारंभ पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवनात झाला. यानंतर श्री. चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चव्हाण म्हणाले, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया व भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) मार्फत अदानींना मोठ्या प्रमाणात विनातारण कर्ज देण्यात आली आहेत. सध्या अदानी समूहाचा मोठा घोटाळा उघडकीस आला असल्याने स्टेट बँक व एलआयसीमधील सर्वसामान्यांचा पैसा असुरक्षित झाला आहे. अशी भयानक परिस्थिती असतानाही विविध मार्गाने अदानीला मदत करण्याचा खटाटोप केंद्राकडून सुरू आहे.’
जगातील सर्वात मोठा घोटाळा होऊनही अदानी बचाव करताना दिसत नाहीत. दुसरीकडे मात्र, केंद्रातील मंत्री अदानींच्या बचावासाठी सरसावले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यशस्वी झाल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. या यात्रेला प्रसिद्धी मिळू नये, याची खबरदारी घेतली गेली होती. आता काँग्रेसने राज्यभर हात से हात जोडो अभियान सुरू केले असून, या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरात काँग्रेसचे विचार व भाजपचा हिशोब पोचवला जाणार आहे. सत्यजित तांबे यांच्याबाबत जे घडले ते दुर्दैवी असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. राज्यातील सरकार हे घटनाबाह्य असून, न्यायालयीन लढ्यात हे सरकार कोसळणार आहे. सरकार टिकेल अशी शाश्वती नसल्यानेच मंत्रिमंडळ विस्तार केला जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

अदानी उद्योग समूहास स्टेट बँक ऑफ इंडिया व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीने विनातारण कर्ज उपलब्ध करून दिले आहे. हे कर्ज केंद्र सरकारच्या सांगण्यावरून दिले आहे. सध्या अदानींचा घोटाळा उघडकीस आल्याने दिलेले कर्ज परत मिळण्याची शक्यता धूसर आहे. वास्तविक या दोन्ही वित्तीय संस्थांमध्ये सर्वसामान्य माणूस गुंतवणूक करतो. हा सर्वसामान्यांचा पैसा परत मिळावा, यासाठी काँग्रेसच्या (Congress) वतीने येत्या सोमवारी दुपारी एक वाजता आंदोलन करण्यात येणार आहे, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.