मुंबई, दि. २७ (पीसीबी) : पक्षफुटीनंतर आणि सत्तेतून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी सातत्यानं बंडखोरांवर आणि भाजपवर तोंडसुख घेतलं आहे. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रसिद्ध झालाय. यातून उद्धव यांनी पुन्हा एकदा फटकेबाजी केली. तसेच एकदा निवडणुका होऊन जाऊ द्या, पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, का नाही होणार? जर शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा नसेल तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे. शिवसेनाप्रमुखांचं वचन आजही कायम आहे. मी पण शिवसैनिकचं आहे पण मी मुख्यमंत्री होणार असं कधीही म्हणालो नव्हतो. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याची वचनपूर्ती झाली, पण तरीही मी गप्प बसणार नाहीए. कारण मला शिवसेना वाढवायची आहे. जर मला शिवसेना वाढवायची नसेल तर माझा पक्ष प्रमुख असण्याचा उपयोग काय? शिवसेनेचं तुफान कायम आहे. लोकांच्या मनात, हृदयात कायम आहे. त्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचं तुफान येईल.
उद्धव ठाकरे म्हणाले, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. सध्या मुंबई महापालिकेवर जो भगवा फडकत आहे तोच भगवा पुन्हा फडकेल. यापूर्वी अनेकांनी म्हटलंय की शिवसेना निवडुकीनंतर राहणार की नाही? पण मुंबईकर आता एकत्र आले आहेत. तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट पाहताहेत. त्यामुळं माझंही मत आहे की मुंबई पालिकेच्याच नव्हे तर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकाही व्हायला हव्यात.