निवडणुकांमध्ये गुलाबी रंग अजितदादांना फळणार का ?

0
85

१९ जुलै (पीसीबी) मुंबई: लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने अजितदादा गटाने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्यात घडामोडी सुरु असताना अजित पवार यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे यापुढे अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये, बॅनर्सवर, जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाअधिक वापर केला जाणार आहे.

गुलाबी रंग मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी स्वत: अजित पवार हेदेखील प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी यापुढे अजित पवार हे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर केवळ गुलाबी जॅकेट परिधान करणार आहेत. त्यासाठी अजितदादांनी 12 गुलाबी रंगाची जॅकेट शिवून घेतल्याचेही समजते. याशिवाय, अजित पवार यांनी कुर्ता आणि जॅकेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह लावण्यासही सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या पक्षाने अचानक गुलाबी रंगाचा इतका वापर सुरु केल्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. याचे उत्तर आता समोर आले आहे.

अजित पवार गटाने अलीकडेच त्यांच्या पक्षाच्या प्रसिद्धीचे काम नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला दिले आहे. या कंपनीच्या सल्ल्यानुसारच अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या सर्व आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्याची चर्चा होती. यानंतर या कंपनीच्या सल्ल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिमावर्धन करण्यासाठी अजितदादा गटाकडून गुलाबी रंगाचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे. नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीने यापूर्वी कर्नाटकमध्ये डी.के. शिवकुमार आणि राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्यासाठी काम केले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये गुलाबी रंग अजितदादांना फळणार का, हे बघावे लागेल.

सॉफ्ट हिंदुत्त्वासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी?
अजित पवार यांनी विधानपरिषद निवडणुकीपूर्वी आपल्या सर्व आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. अजित पवार यांची प्रतिमा सॉफ्ट हिंदुत्त्वाकडे झुकणारी असावी, यासाठी नरेश अरोरा यांच्या सल्ल्याने ही सिद्धिविनायक वारी करण्यात आल्याचे समजते. याशिवाय, अजित पवार लवकरच नगरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या प्रचारार्थ महिलांशी संवाद साधणार आहेत. यामागे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा फायदा एकट्या शिंदे गटाला न होता अर्थमंत्री म्हणून या योजनेचे श्रेय आपल्यालाही मिळावे, असा अजितदादांचा प्रयत्न असू शकतो.