निर्भीड पत्रकारितेमधील आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे विजयराव भोसले – सिमाताई सावळे

0
559

– सिमाताई सावळे यांनी वाहिली भावपूर्ण शब्दांत आदरांजली

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पत्रकारित्या क्षेत्रातील पिंपरी चिंचवडमधील एक चालते बोलते विद्यापीठ म्हणजे जेष्ठ पत्रकार विजयराव भोसले. आजच्या स्पर्धेच्या बाजारू जगातही पत्रकारितेमधील नितीमूल्य कायम ठेवत सेवाभावीवृत्तीने काम करणे तसे कठिणच, पण कोणाचाही मुलाहिजा न ठेवता निर्भीडपणे तो वसा भोसले यांनी अखंडपणे कायम ठेवला. एक आदर्श पत्रकार, मार्गदर्शक आम्ही गमावला आहे, अशा भावपूर्ण शब्दांत स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमाताई सावळे यांनी आपली आदरांजली वाहिली.

जेष्ठ पत्रकार विजयराव भोसले यांच्या निधानामुळे अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लांडगे, राज्य माराठी पत्रकार संघाचे समन्वयक नाना कांबळे, जेष्ठ कामगारनेते आणि साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रताप गुरव यांनीही भोसले यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.

आपल्या शोकसंदेशात सिमाताई सावळे म्हणाल्या, विजयराव भोसले सर हे तमाम राजकीय नेत्यांचे मार्गदर्शक होते. नगरपालिकेच्या स्थापनेपासूनच्या सर्व घडामोडिंचे ते साक्षिदार होते. महापालिकेचे आजवरचे अधिकारी, पदाधिकारी यांच्यामध्ये एक जरब असलेले ते हाडाचे पत्रकार होते. दै. केसरी मधील त्यांची सखोल, अभ्यासपूर्ण वार्तापत्र हे आम्हा सर्वांना दिशादर्शक असतं. आज असे नितीमूल्य सांभणारे पत्रकार खूप कमी आहेत, त्यात पहिल्या क्रमांकाने भोसले यांचे नाव घ्यावे लागेल. लोकसभा, विधानसभा असो वा महापालिका निवडणुकांचे त्यांचे राजकीय विश्लेषण अगदी अचूक असायचे. जुन्या पिढीतील एकूण एक नेते, कार्यकर्त्यांनी परिचीत असे पत्रकार भोसले हे काळाच्या पडद्याआड गेले याचा सर्वांनाच मोठा धक्का आहे. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची ताकद परमेश्वराने त्यांना द्यावी. विजयराव भोसले यांना जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.