निरंकारी सदगुरु माताजींचा नववर्षानिमित्त मानवतेला दिव्य संदेश

0
248

– ब्रह्मज्ञानामुळे आलेली स्थिरता ही जीवनात मुक्तीमार्गाला प्रशस्त करते – निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज

दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – “ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने जीवनामध्ये वास्तविक भक्तिचा प्रारंभ होतो आणि त्याच्या स्थिरतेने आपले जीवन भक्तिमय व आनंदीत होऊन जाते.’’ असे उद्गार सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी ग्राउंड नं.८, निरंकारी चौक, बुराड़ी रोड (दिल्ली) येथे नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्संग समारोह प्रसंगी उपस्थित समस्त भक्तगणांना संबोधित करताना व्यक्त केले. या कार्यक्रमाचा दिल्ली तसेच एन.सी.आर. सह अन्य ठिकाणाहून देखील हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भाविक-भक्तगणांनी लाभ घेतला तसेच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साकार रुपातील सदगुरुच्या दिव्य दर्शनाचा व अमृतवचनांचा आनंद घेऊन स्वत:ला कृतार्थ केले.

सदगुरु माताजींनी ब्रह्मज्ञानाचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की, ब्रह्मज्ञानाचा अर्थ क्षणोक्षणी परमात्मा रुपी दिव्य प्रकाशात विचरण करणे होय. ही अवस्था आपल्या जीवनात तेव्हा येते जेव्हा यावरील दृढता नित्य टिकून राहिल आणि तेव्हाच खऱ्याअर्थाने मुक्ती प्राप्त होईल. याउलट जर आपण मायेच्या अधीन राहिलो तर आनंदाची अवस्था आणि मुक्ती प्राप्त करणे अशक्य होईल हे निश्चित होय. मायेच्या प्रभावापासुन स्वत:चा बचाव करुन जीवनाचा खरा उद्देश परमात्मा प्राप्ती आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याला जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहीजे. या जगामध्ये निरंकार ईश्वर आणि माया या दोहोंचा प्रभाव कायम असतो. यास्तव आपल्याला निरंकाराशी संलग्न राहून भक्ति केली पाहिजे. आपल्या जीवनात सेवा, सुमिरण, सत्संगला केवळ एक क्रियाकर्म किंवा हजेरीसाठी नव्हे तर निरंकार प्रभूशी वास्तविक रूपात एकरूप होऊन स्वत:चे कल्याण करायचे आहे.

सदगुरु माताजींनी उदाहरणासह स्पष्ट केले, की विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. ज्या विद्यार्थ्यांना ज्ञान समजत नाही, त्यांच्या शंका दूर करण्यासाठी तिथे शिक्षक उपस्थित असतात. ते त्यांच्या शंकांचे निरसन करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करतात ज्यायोगे ते शिक्षणाने आपले जीवन यशस्वी करतात. दुसरीकडे काही विद्यार्थी संकोचाने किंवा अन्य काही कारणांनी आपल्या शंका मनामध्येच ठेवतात व पुढे त्याच शंकांचे नकारात्मक भावनेमध्ये रुपांतरण होते. शंकांचे निरसन न झाल्याने त्यांच्या प्रभावाखाली ते जीवनात यशस्वी होऊ शकत नाहीत. सदगुरुचा भाव इतकाच आहे, की केवळ ब्रह्मज्ञान घेतल्याने जीवनात यश मिळू शकत नाही, तर ते समजून घेऊन जीवनात उतरविल्यानेच कल्याण होते. अन्यथा ज्ञानाचा प्रकाश असूनही आपले जीवन अंधारातच राहते आणि आपण आपला अमूल्य जन्म भ्रमामध्येच व्यतीत करतो.
मुक्तीच्या मार्गाचा उल्लेख करुन सदगुरु माताजींनी सांगितले की, ज्यांनी खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञानाची दिव्यता समजून घेतली आणि त्याचा आपल्या जीवनात अंगीकार केला अशासंतांनाच मुक्ती मिळते. जीवनाचे महत्व आणि मोल तेव्हाच होते जेव्हा ते वास्तवात जगले जाते केवळ दिखाव्यासाठी नाही. आपण सर्व नित्य निरंतर क्षणोक्षणी या निरंकार प्रभूशी जोडून राहणे हीच खरी भक्ती होय.

शेवटी सदगुरु माताजींनी सर्वांसाठी हीच प्रार्थना केली, की आपण सर्वांनी आपल्या उत्तम
आचरणाने आणि भक्तीमय जीवनाने अवघ्या जगाला प्रभावित करत सुखद आणि आनंदाने
परिपूर्ण जीवन जगावे. निरंकाराचा आधार घेऊन सर्व संतांचे जीवन मंगलमय व आनंदमय होवो.