निरंकारी संत समागमाचा शुक्रवारी शोभायात्रेने शुभारंभ

0
14

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) : मनुष्य रूपात जन्म प्राप्त केल्यानंतर मानवीय गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख आहे, असे मत माता सद्गुरू सुदीक्षाजी महाराज यांनी व्यक्त केले. पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म येथे संत निरंकारी मिशनद्वारे आयोजित तीन दिवसीय ५८ व्या निरंकारी संत समागमाचा शुक्रवारी शोभायात्रेने शुभारंभ झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या. या समागमामध्ये महाराष्ट्रासह देश-परदेशातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

सद्गुरू सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, ‘विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे सांसारिक उपलब्धीच्या बाबतीत मानवाने प्रगती आणि विस्तार केला आहे. सद्बुद्धीने युक्त होऊन या उपलब्धीचा वापर केला जातो, तेव्हा तो निश्चितच मानवासाठी शांती-सुखाचे कारण बनतो. परंतु, जर यांचा सदुपयोग केला नाही, तर त्या उपलब्धी मानवासाठी नुकसानकारक ठरतात. ब्रह्मज्ञानाद्वारे जेव्हा परमात्म्याला जीवनात उतरविले जाते. तेव्हा मानवाला सद्बुद्धी प्राप्त होते. त्याच्या मनातील द्वेषभावना, स्वार्थीपणा संपतो. प्रत्येक मानवासाठी त्याच्या मनात परोपकाराची भावना निर्माण होते. मानवाने शुद्ध भावनेने या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये स्थान द्यावे.’

समागमस्थळी सद्गुरू सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांचे आगमन होताच भव्यशोभा यात्रा काढण्यात आली. भारताच्या वेगवेगळ्या संस्कृतींचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधले. या शोभायात्रेत मिशनची विचारधारा, आध्यात्मिकतेचे महत्त्व, मानव एकता व विश्वबंधुत्वाच्या भावनेचा विस्तार यावर प्रकाश टाकण्यात आला.