मुंबई, दि. 07 (पीसीबी) : मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरुन रोज मोठ्या संख्येने वाहनधारक जात असतात. हा मार्ग एक्स्प्रेस असल्यामुळे सुसाट वाहने धावत असतात. त्यावेळी अनेक वाहन धारक एक्स्प्रेस वे च्या नियमांचे पालन करत नाही. आता आयटीएमएस प्रणाली अंतर्गत महामार्गावर 52 ठिकाणी दोन्ही बाजूने कृत्रीम बुद्धीमत्तेवर (एआय) आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आता रडारतंत्राचा वापर करुन वाहनांचा वेग मोजता येत आहे. मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांना ई-चलन पाठवण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्यात केली आहे. मुंबई पुणे महामार्गावर घाट परिसरामध्ये हलके मोटार वाहनाची (कार) वेग मर्यादा 60 किमी प्रतितास आहे. उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा 40 किमी प्रतितास आहे. घाट परिसर वगळता इतर ठिकाणी हलके मोटार वाहन (कार) ह्यांची वेग मर्यादा 100 किमी प्रतितास असून उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा 80 किमी प्रतितास आहे.
प्रणाली अंतर्गत बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे सीटबेल्ट परिधान न करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, लेनची शिस्त न पाळणे आदी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांना ई-चलान देण्यात येत आहे. मुंबई-पुणे महामार्गावर जाणाऱ्या वाहन धारकांनी वाहतूक करताना सर्व नियमांचे न केल्यास त्यांना दंड लागणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी दिली आहे.
मुंबई पुणे महामार्गावर अनेक वेळा अपघात झाले आहेत. हे अपघात वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे झाले आहे. यामुळे वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येणार आहे. त्यामुळे शासनाकडून आता तंत्रज्ञानाचा वापर करत बेशिस्त वाहन धारकांना धडा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे वाहन धारक नियमांचे पालन करणार नाही, त्यांना ई चलन पाठवले जाणार आहे.