नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्री

0
170

पाटणा, दि. 28 (पीसीबी) -बिहारमध्ये कालपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. आज या राजकीय घडामोडींना पूर्णविराम लागला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी भारत माता की जय आणि जय श्री रामच्या घोषणा देत शपथ घेतली. तेव्हा जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा उपस्थित होते.

नितीश यांच्यासह जनता दल (युनायटेड) नेते विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव आणि भाजप नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे बिहारचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बिहारमधील बदललेल्या राजकीय समीकरणात नितीशकुमार यांना आता नवे मंत्रिमंडळ मिळणार असल्याने रातोरात आरजेडीचे मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत.

नितीश कुमार यांनी राजदशी असलेली आपली युती तोडली असून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या दोन वर्षांपासून महाआघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे सत्तेत होते. मात्र, नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे बिहारमधील सरकार आपोआपच बरखास्त झाले. तद्नंतर भाजपाने नितीश कुमार यांना पाठिंबा दिला. हा पाठिंबा मिळताच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला.

नितीश कुमारांनी राजीनामा का दिला होता?
राजदबरोबर असलेल्या सत्तेतून राजीनामा देण्याची वेळ का आली? असा प्रश्न नितीश कुमारांना सकाळी विचारण्यात आला होता. त्यावर नितीश कुमार म्हणाले, राज्यकारभार योग्य रितीने चालत नव्हता, त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. तुम्ही पत्रकारांनी मला यापूर्वी अनेकदा विचारल होतं. परंतु, तेव्हा मी बोलणं बंद केलं होतं. आम्ही सर्व परिस्थिती पाहत होतो. त्यानंतर मला लोक वेगवेगळे सल्ले देऊ लागले. मी माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे वेगवेगळे सल्ले घेतले. त्यानंतर आज राजीनामा दिला आहे आणि आमचं सरकार विसर्जित केलं आहे.

नितीश कुमार म्हणाले, आम्ही आधी भाजपाबरोबर युती केली होती. ती युती तोडून यांच्याबरोबर (राजद) आघाडी बनवली. परंतु, इथे येऊनही काही सुरळीत चालत नव्हतं. आमच्या लोकांना त्रास होत होता. ते मेहनत घेत होते. परंतु, काही गोष्टींचं त्यांना वाईट वाटत होतं. त्यामुळे मी या निर्णयापर्यंत पोहोचलो.

इंडिया आघाडीची मोट बांधून एनडीएत सामीलदेशात भाजपाविरोधी वातावरण निर्माण करण्याकरता देशातील विरोधकांची मोट बांधण्याचं काम नितीश कुमारांनी केलं. विरोधकांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन बिहारच्या पाटण्यात करण्यात आलं होतं. त्यावेळी विरोधकांच्या या ऐकीला नावही ठेवण्यात आलं नव्हतं. परंतु, विरोधकांची मोट बांधण्याकरता नितीश कुमारांनी पुढाकार घेतला होता. या विरोधकांच्या एकजुटीला इंडिया आघाडीचं नाव देण्यात आल्यानंतरही नितीश कुमार या आघाडीत अग्रभागी होते. परंतु, गेल्याकाही दिवसांपासून ते इंडिया आघाडीविरोधात भूमिका घेताना दिसले. अखेर त्यांनी इंडिया आघाडीलाच डच्चू देत एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतला
आहे.