मुंबई, दि.१६ (पीसीबी) : पहाटेच्या शपथविधीच्या गौप्यस्फोटानंतर आता आणखी एक मोठं गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं 2014 सालीच भाजपची राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करायचं ठरवलं होतं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. एबीपी माझाकडून ऑफ द रेकॉर्ड मुलाखतीत त्यात हा दावा करण्यात आला आहे. 2014 सालीच राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करण्याबाबत नितीन गडकरी यांचं ठरलं होतं, मात्र मी रोखलं असल्याचही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. नागपूरात झालेल्या एका मुलाखतीदरम्यान फडणवीसांनी सांगितलं आहे.
मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांकडून हा दुसरा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीस यांच्या म्हणण्यानूसार गडकरी आणि पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्लॅन तयार केला होता. त्यास तेव्हा नरेंद्र मोदींनी संमतीदेखील दिली होती. मात्र, मला हे योग्य वाटत नव्हतं, मी प्रदेशाध्यक्ष असताना एक सर्वे करुन घेतला, नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर आम्ही 2014 ची लोकसभेची निवडणुक लढविणार होतो.
राष्ट्रवादीविरोधात आम्ही रान पेटवलं होतं आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो असतो तर, त्याचा योग्य संदेश मतदारांना गेला नसता. त्यामुळे मी मोदींना प्रत्यक्ष भेटून ही युती व्हायला नको, असं सांगितलं होतं. तसेच मी केलेल्या सर्वेक्षणातल्या सर्वेत भाजप-शिवसेना युती झाली तर आपण 42 जागा सहज जिंंकू, असं दिसून येत असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
आपण कोणत्या जागा जिंकू याची यादीदेखील मी तेव्हा मोदींना दिली होती. आणि तसेच घडले भाजप-सेना युती 2014 च्या निवडणुकीत 42 जागांंवर विजयी झाली. त्यानंतरच माझ्यातील नेतृत्व गुण मोदी यांच्या लक्षात आले असावेत. महाराष्ट्राचं राजकारण देखील मला चांगलं समजतं, असं त्यांनी वाटलं असेल त्यातूनच 2019 मध्ये माझी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी त्यांनी निवड केली असावी, अशी पुस्ती फडणवीस यांनी जोडली.











































