पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने खेड तालुक्यातील निघोजे येथे एका लॉजवर छापा मारून कारवाई केली. लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 5) सायंकाळी साडेपाच वाजता मल्हार कॉलनी, निघोजे येथील आर्यन लॉजिंग अॅंड बोर्डिंग मध्ये करण्यात आली.
मोहम्मद जाहिद नजीर हुसेन इद्रीस (वय 38, रा. पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार प्रेम कोकरे (पूर्ण नाव माहिती नाही, वय 38, रा. निगडी) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुनील शिरसाट यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील निघोजे येथील आर्यन लॉजिंग अॅंड बोर्डिंग येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी लॉजवर छापा मारून कारवाई केली. आरोपी मोहम्मद आणि प्रेम यांनी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे या कारवाई मध्ये उघडकीस आले. पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत मोहम्मद याला अटक केली. त्याच्या ताब्यातून 14 हजार 550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.