निगडी प्राधिकरणात १ ते ३ मार्च फुलांचे प्रदर्शन

0
382

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने ‘रानजाई महोत्सव’ व २७ वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धा ’ दिनांक १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या महोत्सवामध्ये पर्यावरण तज्ञांचे मार्गदर्शन, लाईव्ह कॅलिग्राफी, प्राचीन उद्यान कलेचे अस्तित्व या विषयावर व्याख्यान, निसर्ग कवितांचे कविसंमेलन यांसह पर्यावरण संवर्धन व जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून या महोत्सवात शहरवासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

महापौर निवास, सेक्टर नं २७ संत तुकाराम उद्यान शेजारी, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार १ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, संग्राम थोपटे,अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप तसेच माजी नगरसदस्य, नगरसदस्या उपस्थित राहणार आहेत. तर सकाळी ११ वाजता प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांचे ‘उद्यान शिल्पकला’ या विषयावरील प्रात्याक्षिकांचे आणि मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत उदय रामदास यांचा ‘नादब्रम्ह’ हा संगीत संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

२ मार्च रोजी सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्चुत पालव हे ‘लाईव्ह कॅलिग्राफी’ सादर करणार आहेत. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत उद्यान विभागाच्या वतीने तंत्रज्ञान प्रात्याक्षिके आणि परसबाग चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी ५ वाजता ‘प्राचीन उद्यान कलेचे अस्तित्व’ या विषयावर प्रणव गोखले यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता बायोस्फिअर्स संस्थेचे पर्यावरण शास्त्रज्ञ आणि संस्थापक अध्यक्ष सचिन पुणेकर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. संध्याकाळी ६.३० ते ९ वाजेपर्यंत सुप्रसिद्ध गायक अभिजीत कोसंबी व त्यांच्या सहकाऱ्यांचा ‘धुंदी फुलांना – धुंदी कळ्यांना’ हा भव्य गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ‘निसर्ग कविता’ या विषयावर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत रविंद्र भिडे यांचे ‘लागवडीनंतर गुलाबाची काळजी कशी घ्यावी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत स्पर्धेमधील विजेत्या व सहभागी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत पर्यावरण संवर्धन व जनजागृतीसाठी महाफॅशन फाऊंडेशन प्रस्तुत ‘नेचर फॉर वॉक’ या कार्यक्रमाने रानजाई महोत्सवाची सांगता होणार आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे उपआयुक्त रविकिरण घोडके यांनी दिली आहे