हातगाडी, स्टॉल धारकांचा महापालिकेला सवाल.
पिंपरी, दि. ०४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून मुंबई पुणे या जुन्या महामार्गावरील निगडी ते दापोडी १२.५ किलोमीटर मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने फुलझाडे, हिरवळ, रंगरंगोटीद्वारे सुशोभीकरण करण्यात येणार आहे या कामासाठी १०० कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च करण्यात येणार आहेत हे शुशोभीकरण करा मात्र पूर्वीपासूनच या रस्त्यावरील हातगाडी, स्टॉलधारकाना त्यात स्थान काय ? त्यात समावेश करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज दिला.
निगडी ते दापोडी या महामार्गावरील पथारी,हातगाडी, स्टॉल धारकांची बैठक महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ तर्फे आज पिंपरी येथे आयोजित करण्यात आली यावेळी ते बोलत होते. महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, मुख्य संयोजक संभाजी वाघमारे, सय्यद अली, ज्ञानदेव चव्हाण, लता कुंबेकर, अनिता भुजबळ, रुक्मिणी धावारे, महादेव माने, मनोज यादव, सिद्धाराम पुजारी,रमेश डेंगळे, रमेश वाणी, मोहम्मद इराणी, ओम शर्मा, संतोष वाघमारे, शिवाजी पौडमल, मधुकर वाघमारे आदीसह दापोडी ते निगडी मार्गावरील वेक्रेते उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले की आयुक्त शेखर सिंह पदभार स्वीकारल्यापासून फेरीवाल्यांना वैरी समजून कमी लेखत आहेत आणि त्या भावनेतून त्यांच्यावरती कारवाईची भूमिका करीत घेत आहेत, पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी न करता जाणीवपूर्वक मोठ – मोठ्या उद्योजक आणि श्रीमंतलोकांचे प्रतिनिधीत्च असल्यासारखे आयुक्त वागत असून गोर गरीब फेरीवाल्याबाबत त्यांना एवढे वावडे काय आहे ? हाच प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे निगडी ते दापोडी या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे, फुलझाडे,हिरवळ लावा येथे रिक्षा थांबेही निर्माण करा, वाचनालय ही निर्माण करा त्यास आमचा विरोध नाही मात्र ज्या शहरांमध्ये पंचवीस वर्षापासून ज्या हातगाडी, पथारी ,स्टॉल धारकानी आपला उदरनिर्वाह केला आहे. त्यांना त्यात समाऊन घेऊन नियोजन करा, त्यांचा व्यवसाय उध्वस्त करून जर हे करणार असाल तर हे कदापि हे खपवून गेले जाणार नाही आणि महापालिकेसमोर रास्ता रोको केल्याशिवाय हा घटक थांबणार नाही अशा इशाराही नखाते यांनी दिला.