निगडी ते चाकण मेट्रोला १०,३८३ कोटी खर्च, ३१ स्टेशन

0
1

दि.१४ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड शहरासह चाकण एमआयडीसी आणि हिंजवडी आयटी पार्कला मेट्रो मार्गाने जोडला जाणार आहे. याकरिता निगडी ते चाकण मेट्रो मार्गिकेचा आराखडा तयार करुन महानगरपालिकेला सादर केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोकडून दुसरा मार्ग साकारला जात आहे. यामुळे दापोडी ते निगडी आणि निगडी ते चाकण असा संपुर्ण शहराला हे मार्ग जोडले जाणार आहे. निगडी ते चाकण मेट्रो मार्गावर ३१ स्टेशन असून ४०.९२६ कि.मी. अंतर असणार आहे. या मार्गावर एकूण १० हजार ३८३ कोटी ८९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे पिंपरी-चिंचवड, चाकण एमआयडीसी आणि हिंजवडी आयटी पार्कचा भाग मेट्रोने जोडण्यास मदत होणार आहे.

उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात सध्या दापोडी ते पिंपरी अशी मेट्रो धावत आहे. या मार्गाचा निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंत ४.५१९ अंतर विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. दापोडी ते निगडी या एकमेव मेट्रो मार्गानंतर आता निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक ते चाकण असा दुसर्‍या मार्गाचा आराखडा तयार झाला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) ने डीपीआर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर केला आहे. सध्या असलेल्या मेट्रो मार्गिकेप्रमाणेच हा मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) असणार आहे.

या एकूण 10 हजार 383 कोटी 89 लाख खर्चाचा डीपीआरमध्ये एकूण 31 मेट्रो स्टेशन आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वांधिक 25 स्टेशन आहेत. त्यातील नाशिक फाटा ते संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन असे 1.336 किलोमीटर अंतराचा मार्ग तयार आहे. या नव्या मार्गासाठी तसेच, स्टेशनसाठी महापालिका 33 कोटी रुपये किमतीची एकूण 15 हजार 909.65 चौरस मीटर जागा देणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाची एकूण 1 लाख 34 हजार 841.83 चौरस मीटर जागा आहे. त्या जागेचे मूल्य 77 कोटी 8 लाख आहे. तर, 72 कोटी 28 लाख रूपये मुल्यांची 18 हजार 474.18 चौरस मीटर क्षेत्रफळाची खासगी घेण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका सभेने मान्यता दिल्यानंतर तो डीपीआर राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. राज्य शासनाकडून तो केंद्र शासनाकडे पाठविला जाईल. केंद्राकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष मार्गाचे काम सुरू होईल. या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडचा तब्बल ७५ टक्के भागातून मेट्रो धावणार आहे. असे महापालिका अधिका-यांनी सांगितले.

असा असेल मेट्रोचा मार्ग
निगडीतील भक्ती-शक्ती समुहशिल्प चौक, ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भुमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर (वायसीएमजवळ), गवळीमाता चौक, भोसरी एमआयडीसी, वखार महामंडळ गोदाम चौक, पीआयईसी, मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी, चाकण