निगडी, चाकणमध्ये जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल

0
265

चाकण, दि. ६ (पीसीबी) – निगडी आणि चाकण पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात चार जणांना लुटले आहे. निगडित एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले तर चाकण येथे तिघांचे मोबाईल फोन हिसकावण्यात आले आहेत.

द्रौपदी नामदेव पाटील (वय 65, रा. प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी (शनिवारी दि. 4) सायंकाळी पावणे सात वाजता प्राधिकरण निगडी येथे रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्या अमरदीप स्वीट दुकानाच्या समोर आल्या असता एका दुचाकीवरून दोन चोरटे आले. ते पत्ता विचारण्याच्या बहाण्याने फिर्यादीजवळ थांबले. त्यांना बोलण्यात गुंतवून दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 65 हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले.

आकाश बालाजी कासार (वय 24, रा. निघोजे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात तीन चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शुक्रवारी (दि. 3) मध्यरात्री साडेबारा वाजता निघोजे येथे पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या हातातून 37 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेले. त्याच दिवशी सोनूकुमार बहादूर राम आणि राहुल दीपक पांडे यांचेही मोबाईल फोन चोरीला गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.