निगडीतील ‘लाइट हाउस’ प्रकल्पाची अधिका-यांकडून पाहणी

0
312

पिंपरी, १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समाज विकास विभाग आणि लाइट हाउस कम्युनिटी फाउंडेशन यांच्यातर्फे आणि माजी नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांच्या पाठपुराव्यामुळे बेरोजगारांसाठी निगडीत ‘लाइट हाउस’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. निगडी प्रभागातील सावित्रीबाई फुले हॉल येथे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाची केंदळे यांनी आज अधिका-यांसह पाहणी केली.

तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 2019 मध्ये प्रकल्पाची शिफारस केली होती. महिला व बालकल्याण समितीने या प्रस्तावास डिसेंबर 2019 मध्ये आणि स्थायी समिती सभेने जानेवारी 2020 मध्ये मंजुरी दिली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. लॉकडाउन जाहीर झाले. त्यातच साधारणतः आठ महिन्यांचा कालावधी गेला. आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे ‘लाइट हाऊस’ प्रकल्पाला मुहूर्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर चालू करण्यात यावा, यासाठी माजी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी मागील दोन वर्षापासून सतत पाठपुरावा केला होता. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील तसेच पालिकेचे अधिकारी अजय चारठाणकर यांच्या सहकार्याने अखेर ‘लाईट हाऊस’ प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.

असा असेल प्रकल्प !
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये जागांच्या उपलब्धतेनुसार ‘लाइट हाउस’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरातील 18 ते 30 वर्षे वयोगटातील युवक व युवतींसाठी रोजगार निर्मिती करण्याचा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी मुलभूत सोयीसुविधा महापालिका विनामूल्य उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये जागा, संगणक संच आदींचा समावेश आहे. यात सहभागी युवक-युवतींना लाइट हाउस कम्युनिटी फाउंडेशनतर्फे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ व अनुषंगीक खर्च सीएसआर अर्थात सामाजिक दायित्व निधीतून केला जाणार आहे. निगडी प्रभागातील सावित्रीबाई फुले स्मारक इमारतीत प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी आवश्‍यक सुविधा महापालिका उपलब्ध करून देणार आहे.

अधिकाऱ्यांकडून ‘लाइट हाउस’ प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी

शहरातील तसेच निगडी प्रभागातील सर्वात जास्त बेरोजगार युवक-युवती ह्या से.नं. 22 या भागात आहेत. या उद्देशाने माजी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी विचार करून निगडी प्रभागात ‘लाइट हाउस’ चालू करावा, या हेतूने आयुक्तांकडे तगादा लावला होता. प्रकल्पासाठी निगडी प्रभागातील जागा सुद्धा केंदळे यांनी सुचविली होती. या जागेचा पुरेपूर वापर प्रभागातील सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगार निर्मितीसाठी व्हावा, म्हणून सावित्रीबाई फुले हॉलची निवड करण्यात आली. या हॉलची महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आज पाहणी करण्यात आली. यावेळी महापालिकेचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, कार्यकारी अभियंता विजय काळे, राजेंद्र शिंदे, विजय वावरे, लाईट हाऊस प्रकल्प संस्थेचे अधिकारी उपस्थित होते असे माजी नगरसेवक केंदळे यांनी सांगितले.