निगडीतील दुर्गा टेकडी परिसरात बिबट्याचा वावर, वन विभागाला तातडीची कारवाई करण्याची मागणी

0
23

निगडी येथील दुर्गा देवी टेकडी परिसरात आज जलतरण तलावाजवळ बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुर्गा टेकडी तात्काळ बंद करण्यात आली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्याने कुत्रा किंवा अन्य प्राणी खाल्ल्याने तो अस्वस्थ अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळूनही पोलिस यंत्रणा उशिरा घटनास्थळी दाखल झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून नागरिकांना टेकडी परिसरात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली असली तरी अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर वन क्षेत्रपाल अधिकारी, शिवाजीनगर कार्यालय यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणी पिंजरे लावण्यात यावेत तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, पोलिस आयुक्त तसेच वन विभागाकडे निवेदन देत नागरिकांच्या सुरक्षेस प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.