निगडीतील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित होणार; पर्यायी जागा शोधण्याची आयुक्तांची सूचना

0
150

पिंपरी दि.२४ (पीसीबी) – निगडी, प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 26 येथे महापालिकेने प्रस्तावित केलेले कचरा संकलन केंद्राला लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा विरोध पाहून हे केंद्र स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. लोकवस्तीपासून लांब हे केंद्र करावे. त्यासाठी पर्यायी जागा शोधण्याची सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी अधिका-यांना दिली.

आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ, माजी नगरसेविका शैलजा मोरे, शर्मिला बाबर यांची आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक झाली. शहरातील घनकचऱ्याचे योग्य रितीने व्यवस्थापन होण्यासाठी इंदूर शहराच्या धर्तीवर चार ठिकाणी कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. निगडी, प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 26 येथे कचरा संकलन केंद्र उभारण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले होते.

परंतु, हे केंद्र दाट लोकवस्तीत उभारले जात असल्याने सुरुवातीपासूनच माजी नगरसेवक अमित गावडे यांनी त्याला तीव्र विरोध केला. हे कचरा संकलन केंद्र दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. त्याविरोधात आवाज उठविला. त्यानंतरही प्रशासनाने गुरुवारी पुन्हा काम सुरु करण्याचा प्रयत्न केला असता गावडे यांनी तत्काळ तिथे धाव घेतली. काम बंद करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

त्यानंतर आज आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत आमदार, स्थानिक माजी नगरसेवकांची बैठक झाली. आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ”दाट लोकवस्तीत कचरा संकलन केंद्र करु नये. प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 26 येथे कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करावे. त्यासाठी वाहतूकनरी भागात पर्यायी जागा शोधण्याची सूचना त्यांनी अधिका-यांना केली”.