निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची बिले काढणाऱ्या १८ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

0
18

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) : महापालिका हद्दीतील स्थापत्य विभागाची कामे निकृष्ट व दर्जाहीन करणाऱ्या ठेकेदारांची बिले काढण्यास मदत करणाऱ्या १८ अधिकाऱ्यांना महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. यात १० कनिष्ठ अभियंता आणि ८ उपअभियंत्यांचा समावेश आहे. कर्तव्य आणि जबाबदारी विसरून बिले काढण्यास ठेकेदारांना मदत करत अप्रत्यक्षपणे अशा कामामध्ये सहभाग नोंदविल्याने या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

स्थापत्य विभागातील अधिकारी, राजकारणी आणि ठेकेदारांनी मिळून निकृष्ट व दर्जाहीन कामे केली. यातून त्यांनी पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला. यातील अकरा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकत कामांच्या दुप्पट रक्कम वसूल करण्यात येणार आहे. या कामावर देखरेख करणारे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई न करता मोकाट सोडले होते.

याबाबत ‘सीविक मिरर’ने वृत्त प्रसिध्द करताच शहर अभियंता मकरंद निकम यांनी त्या वृत्ताची दखल घेऊन १८ कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. महापालिकेच्या स्थापत्य विषयक कामात ४० ते ४५ टक्के पेक्षा कमी दराने ठेकेदारांनी निविदा भरून निकृष्ट कामे करत लाखो रुपयांची बिले लाटली आहेत. महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून आठही क्षेत्रीय कार्यालयात विविध कामे करण्यात येतात. तसेच केलेल्या कामाच्या देखभालीची कामे करण्यात येतात.

महापालिकेच्या स्थापत्य विभागातील रस्ते दुरुस्ती, पेव्हिंग ब्लाॅक, मातीचे जाॅगिंग ट्रॅक यासारखी कामे घेताना ११ ठेकेदारांनी १४ विकास कामात तब्बल ४० ते ४५ टक्के कमी दराने निविदा भरल्या होत्या. एवढ्या कमी दरात कामे घेतल्यानंतर त्याचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहिली का? याबाबत आयुक्त शेखर सिंह यांना खातरजमा करायची होती. त्यानुसार आयुक्त सिंह यांनी ११ ठेकेदारांच्या १४ कामाचा दर्जा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ( सीओईपी) यांच्याकडून तपासण्याचे आदेश महापालिका दक्षता व नियंत्रण विभागाला सप्टेंबर २०२२ मध्ये दिले होते.

दक्षता व नियंत्रण विभागाने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) COEP कडून कामांची गुणवत्ता व दर्जाची तपासणी करण्यात आली. सीओईपीने केलेल्या तपासणीत पेव्हिंग ब्लाॅकच्या कामात ब्लाॅक खचलेले, ज्या ठिकाणी दुरुस्ती आवश्यक अशा ठिकाणी दुरुस्तीच केलेली नाही, महापालिका मानांकनानुसार काम झालेले नाही, रस्ते दुरुस्ती केल्यानंतर त्वरित खड्डे पडणे, रस्त्यावरील काॅंक्रिट थराची जाडी कमी असणे, जाॅगिंग ट्रॅकवर कमी माती टाकणे, निविदेनुसार काम न करणे अशा शेकडो त्रुटी समोर आल्या आहेत. या तपासणीचा अहवाल आठ महिन्यांपूर्वी आयुक्तांना सादर केला होता. त्यानुसार दोषी ठेकेदारासह अधिका-यावर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले होते.

शहर अभियंता मकरंद निकम यांनी ११ ठेकेदारांना केवळ एका वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेत तसा आदेश काढला आहे. तसेच ठेकेदारांकडून निकृष्ट केलेल्या कामाचा निविदा रकमेच्या दुप्पट खर्च वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दक्षता समितीने निकृष्ट कामांवर देखरेख असलेल्या कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांची माहिती दक्षता विभागाने शहर अभियंत्यांकडे मागविली. निकृष्ट कामे होताना संबंधित देखरेख करणारे कनिष्ठ अभियंते आणि उपअभियंता अशा १८ जणांना शहर अभियंत्यांनी कारणे दाखवा नाेटीस बजावली. त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. संबंधित अधिका-यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.