हप्तेखोर पोलिसांचे डोळे केव्हा उघडणार ते देवच जाणो. हप्तोखोर म्हटले कारण, जेलमध्ये असलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींमुळे पोलिसांना मिळालेले हप्तेखोरीचे बिरूद कायम आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच आज पिंपरी चिंचवड शहर धोक्याच्या वळणावर आहे. खून, खंडणी, चोऱ्या, दरोडे, दारु, मटका थोडेफार आटोक्यात आले होते ते आता पुन्हा नव्या दमाने सुरू झालेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या उद्योगनगरीत मिसरुड फुटलेली हजारोवर पोरटोर गुन्हेगारीत गुरफटलेली आढळलीत. ओटा स्किम, घरकुल, आकुर्डी, भोसरी, बालाजीनगर, मोहननगर, आनंदनगर हे अक्षरशः अड्डे झालेत. काही भंपक, थर्डक्लास राजकारणी टपोरी पोरांचा वापर करतात आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त करतात. तेच पुढे भाई, दादा होतात आणि दहशत पसरवतात. राजकारणाच्या गटारातून ही किड पैदा होते आणि समाजाची डोकेदुखी बनते. शेकडो उदाहरणे देता येतील. या शहरात भंगार चोरी करणारा सुसंस्कृत राजकिय पक्षाचा नेता बनतो. ३०२ म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल असणारासुध्दा नगरसेवक होतो. खंडणीखोर महापौर होतो, तर भू माफिया उपमहापौर बनतो. त्यांचाच आदर्श डोळ्या समोर ठेऊन २० च्या आतली मुले गुन्हेगार होतात. म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतोय. आजच्या परिस्थितीला किराणा, हॉटेल, रेस्टॉरंट, सराफ, भाजी विक्रेत्यांपासून तमाम व्यापारी, उद्योजक, बिल्डर्स यांचे जगणे या बाल गुन्हेगारांनी मुश्किल केले आहे. पोलिस त्याकडे आजही गांभिर्याने पाहात नाहीत, याचा संताप आहे. यावर नियंत्रण आणले पाहिजे, ते काम पोलिसांचेच आहे. अन्यथा आगामी काळात पिंपरी चिंचवड शहराचा कडेलोट ठरलेला आहे.
पोलिसांवर आगपाखड करण्याचे कारणही तसेच आहे. अगदी कालचीच घटना. उच्चभ्रू अशा ग्रीनफ्लिड हाऊसिंग सोसायटीमधील आदित्य गजानन ओगले या आठ वर्षांच्या बालकाची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच सोसायटीत राहणाऱ्या मंथन किरण भोसले आणि घरकुल वसाहतीत राहणाऱ्या अनिकेत समदर या दोघांनी हे कृत्य केले. गुन्हेगार दोघेही २०-२१ मधले. २० कोटी रुपयेंच्या खंडणीसाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले. एकतर्फी प्रेम प्रकऱणावरून ओगले व मंथन भोसले या दोन कुटुंबात वाद झाला. तोच राग मनात ठेऊन आदित्य च्या खुनातून बदला घेतला, असेही आता पुढे आले. आदित्यचे वडिल गजानन ओगले हे प्रथितयश बिल्डर आहेत. आज घराघरातून आदित्यच्या मृत्युवर हळहळ व्यक्त होत आहे. शहरातील यापूर्वी घडलेल्या अशाच काही गुन्ह्यांचा आढावा घेतला तर परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पोलिस, समाज, प्रत्येक कुटुंब, आजचे गलिस्छ राजकारण हे सगळे प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष याला जबाबदार आहेत. एकटे पोलिस काय करणार, असे सोयिस्कर उत्तर कामाचे नाही. पोलिसांनी आरोपींना वेळेत शोधले याचे कौतुक आहे. किमान यापुढे असे आदित्य बळी जाणार नाहीत, पुन्हा असे गुन्हे घडणारच नाहीत यासाठी ठोस उपाय योजन्याची गरज आहे. सोशल मीडिया, आजचे चित्रपट, गुन्हेगारी मालिका, गुन्हे वृत्त आवडणारे सुध्दा अलगद गुन्हेगारीत ओढले जातात. इंटरनेटच्या मोहजालात विकृत माहितीच्या आहारी गेलेली अनेक मुले गुन्हेगार होतात. घरातील आई-वडिलांची भांडणेसुध्दा मुलांवर वाईट परिणाम करतात. असे अनेक घटक आहेत जे बाल गुन्हेगारी वाढवत आहेत. आदित्यच्या खुना निमित्ताने यावर थोडे मंथन झाले पाहिजे. आपला मुलगा किंवा मुलगी उद्या या जाळ्यात अडकणार नाही ना याची काळजी प्रत्येक आई बापाला असली पाहिजे. दिघी मध्ये एका दहावीच्या हुशार विद्यार्थाला त्याच्याच मित्रांनी जंगलात नेऊन मारले. त्या मुलाच्या कुटुंबाने घाबरून शहर सोडले. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांचे आकर्षण विशेषतः काही मुलींनासुध्दा आहे. पिंपरीतील एक टिकटॉक फेम मुलगी थेट भाईगीरीची भाषा करत सोशल मीडियात पॉप्युलर झाली. पोलिसांनी दोनवेळा उचलले पण तिची खोड मोडली नाही. वाणगीदाखल हे काही दाखले दिलेत. गुन्हेगारांवर बिलकूल वचक नसल्याने पोलिसांच्या प्रति जनतेच्या मनात तिरस्काराची भावना आहे. हे चित्र बदलले पाहिजे.
पूर्वाश्रमीचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहर बालगुन्हेगारी मुक्त करायचा संकल्प केला होता. त्यासाठी योजना आखली होती. काही स्वयंसेवी संस्था, मानसोपचार तज्ञ यांची मदत घेऊन या उपक्रमाची सुरवातही केली होती. काही खासगी कंपन्या, बिल्डर्स यांनी त्याचे महत्व ओळखून त्यासाठी सीएसआर फंडातून निधीसुध्दा उपलब्ध करून दिला होता. सुरवातीच्या टप्प्यात ३०० बाल गुन्हेगारांना त्या काळकोठडितून बाहेर काढायचे आणि सन्मार्गाला लावायचे ठरले. डॉ. सागर कवडे यांच्या सारख्या अत्यंत कार्यक्षम, प्रामाणिक सहआयुक्तांची त्यासाठी नियुक्तीसुध्दा केली होती. या मुलांचे समुपदेशन करायचे, त्यांची आवड निवड ओळखायची, त्यांना हवे नको ते उपयोगी प्रशिक्षण द्यायचे आणि स्वतःच्या पायावर उभे करायचे, अशी ही योजना होती. कृष्ण प्रकाश बदलून गेले आणि त्यांच्या मागे त्या योजनेचाही बोऱ्या वाजला. पुढच्या मोठ्या संकटातून समाज आणि शहर वाचवायचे असेल तर यावर पुन्हा नव्या जोमाने काम केले पाहिजे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हा विषय फक्त बोलून दाखविली, पण त्यावर पुढे काही प्रगती दिसली नाही. दोन वर्षांपूर्वीचा ४०० बाल गुन्हेगारांचा आकडा आता बराच पुढे गेला असेल. समाजातील सामान्य माणूस मुका आहे, पण सहनशिलतेचा अंत झाला तर तो अक्कू यादव सारख्या गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या करतो, ते नागपूरमध्ये आपण पाहिले. `सद्रक्षणाय खलनिग्रहणाय` हे ब्रिद विसरून पोलिस जर गुन्हेगारांचीच साथ देत राहिले तर उद्या जनतासुध्दा कायदा हातात घेऊ शकते. लोकांना आजकाल `शिवाजी पार्क`, `वेनसडे`, `हॉलिडे` सारखे चित्रपट आवडू लागलेत. आदित्य ओगले च्या खुनातून समाजाचे मन ओळका आमि कामाला लागा. शहर बाल गुन्हेगारी मुक्त करा, तीच निष्पाप आदित्य ओगले ला खरी आदरांजली ठरेल.