नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी

0
223

नाशिक, दि. १८ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महायुतीत चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण, नाशिक लोकसभेची जागा आम्हालाच मिळावी, असा आग्रह भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून वारंवार केला जातोय.

नाशिकच्या जागेवर फक्त भाजपचाच हक्क असून हेमंत गोडसे आतापर्यंत भाजपमुळेच खासदार झाल्याचा दावा स्थानिक कार्यकर्ते करीत आहेत. यासाठी भाजप नेत्यांनी एक बैठक देखील घेतली आहे. नाशिकमध्ये भाजपचे ३ आमदार आणि ६६ नगरसेवकांची ताकद असल्याने या जागेवर भाजपचा उमेदवार अगदी सहजपणे निवडून येऊ शकतो, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

मोदी-शहांचं लोकसभेत ४०० पार खासदार निवडून येण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची नाशिकची जागा भाजपलाच सोडण्यात यावी, अशी मागणी भाजप पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्षांनी वरिष्ठांकडे केली आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून भाजप शिंदे गटावर दबावतंत्राचा वापर करतंय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

खासदार हेमंत गोडसे यांनी युतीधर्म पाळला नसून भाजपला दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप करत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार देखील केली आहे.