नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का! समीर भुजबळ यांचा राजीनामा; शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज

0
108

नाशिक, दि. 24 (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा झाली. तसेच अमित शाह यांनी यावेळी तीनही नेत्यांना महायुतीमधील बंडखोरी रोखा, अशी सूचना केली. पण अस असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या घरातील सदस्यानेच बंड पुकारलं आहे. नाशिकच्या नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण याच ठिकाणाहून छगन भुजबळ यांचे पुतणे तथा माजी खासदार समीर भुजबळ हे इच्छुक आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर आरोप करत आपण नांदगावमधून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपण 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार, अशी माहिती समीर भुजबळ यांनी यावेळी दिली. विशेष म्हणजे आपण अपक्ष लढणार असल्याची घोषणा समीर भुजबळ यांनी केली.

“गेले अनेक दिवस मी या मतदारसंघात दौरे करत होतो. पंकज भुजबळ यांनी 10 वर्ष इथे काम केलं. आमचं संघटन इथे मजबूत आहे. गावपातळीवर आमचं संघटन आहे. मी 2009 मध्ये खासदार असताना देखील मी पक्षाचे चिन्ह गावपातळीवर पोहोचवण्याचे काम केले. नाशिकमध्ये अनेक विकासात्मक कामे केली. मुंबई-नाशिक हायवे, उड्डाणपूल, एअरपोर्ट, बोटॅक्लब या सारखे अनेक कामे केली. नाशिकला नावारूपाला आणण्याचे काम केले. विकासाचे काम सातत्याने केले. मुंबई नाका येथे आशिया खंडातील सर्वात मोठा पुतळा बसवला. किकवी धरणाला मंजुरी मिळवून देण्यात माझा मोठा वाटा आहे”, असा दावा समीर भुजबळ यांनी केला.

“मंत्री छगन भुजबळ 1985 पासून आमदार आहेत. मला आमदार व्हायलाच पाहिजे अशी माझी अपेक्षा नाही. मी आजही मुंबई प्रदेश अध्यक्ष आहे. आमदार होण्याची इच्छा आहेच असे नाही. मात्र नांदगावची जी परिस्थिती आहे ती भयानक आहे. या ठिकाणी 10 वर्षात पंकज भुजबळ यांनी केलेल्या कामांना खीळ बसली होती. युतीचे सरकार आहे. नांदगावमध्ये सुद्धा संधी मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध करून दिली होती. नांदगावमध्ये पाण्याचा प्रश्न आजही ज्वलंत आहे”, असं समीर भुजबळ म्हणाले.