दि ६ मे (पीसीबी ) – नाशिक: महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक असलेले, पण तिकीट न मिळालेले शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीमधील तिन्ही मोठ्या पक्षांमध्ये अस्वस्थतता आहे. जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख असलेल्या शांतीगिरी महाराजांना नाशिकमधून निवडणूक लढवायची होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना संधी दिली. त्यामुळे शांतीगिरी महाराज नाराज झाले.
शांतीगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगावात आहे. २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार होण्यासाठी महाराज प्रयत्नशील आहेत. महायुतीनं आपल्याला संधी द्यावी यासाठी त्यांचे प्रयत्न होते. पण महायुतीनं त्यांना तिकीट दिलं नाही. शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल या आशेनं त्यांनी अर्ज भरताना पक्षाच्या कॉलममध्ये शिवसेनेचा उल्लेख केला. पण पक्षानं एबी फॉर्म न दिल्यानं त्यांचा अर्ज बाद झाला. पण महाराजांचा अपक्ष अर्ज कायम आहे. त्यामुळे महायुतीची धाकधूक वाढली आहे.
नाशिकच्या जागेवरुन उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. शांतीगिरी महाराजांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मनधरणीसाठी महायुतीचे प्रयत्न सुरु आहेत. तिन्ही पक्षाचे नेते, मंत्री त्यांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात आहेत. पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महाराजांची समजूत घातली जात आहे. पण महाराज अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचं समजतं.
बँक खात्यात ११ रुपये असलेले ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; ठाकरेंच्या शिलेदाराची अडचण
महाराजांच्या नाराजीचा कुठे कुठे फटका?
उत्तर महाराष्ट्रात जय बाबाजी भक्त परिवाराची संख्या मोठी आहे. महायुतीनं महाराजांना डावलल्याची भावना भक्त परिवारात आहे. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे अडचणीत आले आहेत. महाराज निवडणूक लढल्यास मतांचं ध्रुवीकरण होईल. त्याचा फटका गोडसेंना बसेल. मुख्यमंत्री शिंदेंनी नाशिकची जागा प्रतिष्ठेची केली. शेवटपर्यंत ताणून धरत ती आपल्या पदरात पाडून घेतली. पण महाराजांमुळे हीच जागा धोक्यात आली आहे.
नाशिकसोबतच दिंडोरीही डेंजर झोनमध्ये
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव, निफाड, येवला, दिंडोरी विधानसभा मतदारसंघातही जय बाबाजी भक्त परिवाराचं प्रमाण मोठं आहे. इथल्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांनाच भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर शांतीगिरी महाराजांची भेट घेतली होती. सहकार्याची विनंती त्यांनी केली होती. नाशिकमध्ये काय होतं ते बघू, मग दिंडोरीत काय करायचं पाहू, असं त्यावेळी महाराजांनी म्हटलं होतं. त्यामुळे दिंडोरीत ३ लाखांच्या घरात असलेला भक्त परिवार पवारांविरोधात जाऊ शकतो.
नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांना मतदान आणि दिंडोरी, धुळे, जळगावात महाविकास आघाडीला छुपा पाठिंबा अशी भूमिका भक्त परिवारानं घेतल्यास महायुतीच्या चार जागा धोक्यात येतील. धुळ्याचे विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार सुभाष भामरेंनीदेखील त्यांना उमेदवारी मिळताच महाराजांची भेट घेतली होती. धुळ्यात असलेल्या परिवाराच्या मतदारांची संख्या पाहूनच ही भेट घेण्यात आली होती. महायुतीनं तिकीट नाकारल्यानं नाराज असलेला परिवार आता महाविकास आघाडीला सहकार्य करुन महायुतीला धक्का देऊ शकतो.
हेमंत गोडसेंना महायुतीची उमेदवारी; आधीच शिवसेनेकडून अर्ज भरलेले शांतिगिरी महाराज आता अपक्ष लढणार
शांतीगिरी महाराज २००९ मध्ये औरंगाबादमधून अपक्ष लढले होते. महाराजांमुळे हिंदू मतांचं ध्रुवीकरण झालं आणि शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना निसटत्या विजयावर समाधान मानावं लागलं. खैरेंना २ लाख ५५ हजार ७८६ मतं मिळाली. तर महाराजांनी जवळपास दीड लाख मतं घेतली. खैरे या निवडणुकीत ३३ हजार मतांनी निवडून आले