नाल्यांची साफसफाई २६ टक्के पूर्ण

0
199

पुणे, दि. ०६ (पीसीबी) – पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी रस्त्यांची दुरुस्ती, नाल्यांची साफसफाई यांसह वेगवेगळ्या प्रकराची २६ टक्के पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित कामे १० जूनपर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

दरवर्षी पुणे महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी विविध कामे केली जातात. यासाठी यंदाही पावसाळ्यापुर्वीच्या कामासाठी महापालिकेकडून पाच निविदा जारी करण्यात आल्या होत्या. गुरुवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी चालू वर्षात सुरू असलेल्या पावसाळी कामांचा आढावा घेतला.

याबाबत माहिती देताना विक्रम कुमार यांनी सांगितले की, “शहरातील पावसाळी नाले व नाल्यांच्या सफाईचे २६ टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळी नाल्यांची साफसफाई केल्यानंतर काढलेला कचरा विलंब न लावता उचलला जात आहे. तर रस्ते दुरुस्तीची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत.”

“तसेच केबल व इतर सेवा वाहिन्यांसाठी खोदाईला परवानगी देताना ३१ मे पूर्वी खोदलेले रस्ते शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल. याशिवाय, एमएनजीएल गॅस लाइन, पाणीपुरवठा आणि एमएसईबी सारख्या अत्यावश्यक कामांसाठी १० जून पर्यंत खोदकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे”, असेही विक्रम कुमार यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, “बाधित गावांमध्ये ३८५ कोटी रुपयांची ड्रेनेज लाईनची कामे सुरू आहेत. येत्या अडीच वर्षांत ही कामे पूर्ण होतील. आराखड्यानुसार ड्रेनेज लाईनचे काम करताना काही ठिकाणी खाजगी जमिनीतून पाईप लाईन टाकावी लागणार आहेत. याला जमीन मालकांचा विरोध आहे. अशा ठिकाणी वरिष्ठ पातळीवर विनंती करून जागा मालकांची परवानगी घेतली जाईल. मात्र, त्यानंतरही विरोध कायम राहिल्यास कायद्याचा वापर करून ड्रेनेज लाइनची कामे केली जातील”, असेही विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.