नारी शक्तीचा आक्रोश मोर्चाला मोठा प्रतिसाद

0
106

पिंपरी, दि. २ (पीसीबी) : देशातील आणि राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील तमाम पुरोगामी विचारांच्या महिला संघटनांच्या वतीने व सामाजिक संघटनांच्या वतीने आज 1 सप्टेंबर 2024 रोजी नारी शक्तीचा आक्रोश मोर्चा आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकातून निघून आकुर्डी गावठाण, दत्तवाडी विठ्ठलवाडी मार्गे निगडी येथील तहसीलदार कचेरी येऊन धडकला. मोर्चामध्ये विविध संघटनांच्या महिला प्रतिनिधी व त्यांच्या सदस्यांनी खूप मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. या महिलांना पाठिंबा देण्यासाठी अनेक पुरुष सामाजिक कार्यकर्तेही या मोर्चामध्ये उपस्थित होते.
बदलापूर घटनेमधील अत्याचारित मुलींच्या आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी, सर्व शाळांमध्ये व खाजगी कार्यालयांमध्ये सीसीटीव्हीकॅमेरे बसवण्यात यावेत, सर्व पोलीस स्टेशनमध्ये महिला मित्र म्हणून त्या त्या भागातील महिला संघटना प्रतिनिधींची नियुक्ती करावी, राज्यामध्ये प्रलंबित असलेल्या महिला अत्याचाराच्या बद्दलच्या जेवढ्या कोर्ट केसेस आहेत त्या आगामी सहा महिन्यांमध्ये निकालात काढण्यात याव्यात, महिलांच्या सुरक्षिततेबद्दल समस्यांवर उपाय योजना सुचवणारी एक समिती शासनाने सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागासह तयार करून, त्यामध्ये उपाययोजना व मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी व त्याला व्यापक पातळीवर प्रसिद्धी द्यावी, महाराष्ट्रातील महिला सुरक्षिततेसाठी चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात यावे, महाराष्ट्रातील सर्व निवडून आलेल्या आमदार खासदार आदी लोकप्रतिनिधींना महिला विषयक कायद्याचे प्रशिक्षण सक्तीचे करण्यात यावे व ते प्रशिक्षण न घेतल्यास त्यांना मानधन देऊ नये, या व अशा अनेक मागण्या या मोर्चाद्वारे शासनाकडे करण्यात आल्या. रविवार साप्ताहिक सुट्टीचा दिवस असतानाही पिंपरी चिंचवड तहसीलदार कचेरी कडून निवेदन घेण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती.

मोर्चा तहसीलदार कचेरीवर आल्यानंतर त्या ठिकाणी अनेक महिला प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लता भिसे सोनवणे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत, माजी नगरसेविका प्रियंका बारसे, डॉक्टर मनीषा गरुड, सविता इंगळे, एडवोकेट मनीषा महाजन, कॉम्रेड अपर्णा दराडे, सामाजिक कार्यकर्त्या आशा बैसाणे, मंगलाताई मुनेश्वर, सुनिता शिंदे मनोगते व्यक्त करून सरकारचा निषेध केला. आगामी काळामध्ये पिंपरी चिंचवड शहरांमध्ये महिलांची एक विस्तारित समिती निर्माण करून त्या समितीच्या द्वारे शहरातील महिलांमध्ये व कष्टकरी वर्गांमध्ये महिलाविषयक कायद्याचे प्रबोधन करण्याची करण्यात आले. या मोर्चाचे मुख्य समन्वयक मानव कांबळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले आणि सभेचे सूत्रसंचालन केले. तहसीलदार कचेरीतील सक्षम अधिकाऱ्याकडे निवेदन देऊन राष्ट्रगीताने हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

मारुती भापकर, विनायक रणसुभे, सतीश काळे, धनाजी येळकर पाटील, वैभव जाधव, नरेंद्र बनसोडे, जितेंद्र छाब्रा, चंद्रकांत लोंढे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, नकुल भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.