पिंपरी चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली माहिती.
पिंपरी, दि. 10 (पीसीबी) : अखंड मराठा समाजाचा नारायण गडावर पहिलाच दसरा मेळावा शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता श्रीक्षेत्र नारायणगड तालुका शिरूर जिल्हा बीड येथे होणार आहे.या मेळाव्यास लाखो गरजवंत मराठा बांधव उपस्थित रहाणार आहेत. उपस्थित मराठा समाजास संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत.गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रातील हजारो मराठा समन्वयक आपापल्या भागात कोपरा बैठका घेऊन समाजास मेळाव्यास जाण्यासाठी करायच्या तयारी बाबत मार्गदर्शन करत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात अनेक बैठकांमधून पूर्ण तयारी करण्यात आली आहे.पिंपरी चिंचवड शहरातील हजारो मराठा बांधव या मेळाव्यास उपस्थित रहाण्यासाठी शनिवारी पहाटे प्रयाण करणार आहेत अशी माहीती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतिश काळे,प्रकाश जाधव,नकुल भोईर,जीवन बोराडे,अभिषेक म्हसे, शिवाजी पाटोळे,गणेश देवराम यांनी निवेदनातून दिली आहे. मराठा समाज गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे.सरकारने याबाबत आश्वासन देऊन सुद्धा मागणी पूर्ण केली नाही.याविषयी पुढील कृती कार्यक्रम काय असेल याचे मार्गदर्शन जरांगे पाटील करणार आहेत.याकडे मराठा समाजासह सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.










































