नातेवाईक तरुणीने चोरले सव्वादोन लाखांचे दागिने

0
525

तळेगाव दाभाडे, दि. १९ (पीसीबी) – भाचीने मामाच्या घरातून दोन लाख १८ हजारांचे दागिने चोरले. त्यानंतर मामाने भाचीविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी भाचीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. १६) मावळ तालुक्यातील माळवाडी येथे घडली.

याप्रकरणी ५८ वर्षीय मामाने सोमवारी (दि. १८) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २४ वर्षीय भाचीला अटक करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक पंडित अहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी फिर्यादी यांच्या घरी राहत असताना घराच्या उघड्या खोलीत ठेवलेली चावी घेऊन घराचा मुख्य दरवाजा उघडला. त्यानंतर लोखंडी कपाटातून एक लाख २० हजारांचे मंगळसूत्र, ३५ हजारांचे ब्रेसलेट, ३० हजारांची चपटी चेन, १२ हजारांची चौकोनी अंगठी, नऊ हजारांची अंगठी, १२ हजार रोख रक्कम असा एकूण दोन लाख १८ हजारांचा ऐवज चोरून नेला.

घरातील दागिने चोरीला गेल्यानंतर सर्वांकडे विचारपूस केली असता फिर्यादी यांच्या भाचीने दागिने चोरल्याचे सांगितले. मात्र तिने ते दागिने परत न दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.