नाट्य, चित्रपटात एआय मुळे कलाकारांवर टांगती तलवार

0
137
  • एआयचा वापर टाळा आणि हाडा मांसाचे कलाकार कास्ट करा, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

आता एआयचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर मालिका, नाटकांमध्ये होताना पाहायला मिळत आहे. एआयचा वापर तंत्रज्ञानासाठी व पात्रांसाठी केला जात आहे. मालिकेत एआयचा वापर करून पात्र उभं केलं जातं आहे. जे एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला खटकलं असून तिने संतापून सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे; जी सध्या व्हायरल होतं आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील दुर्गा म्हणजे अभिनेत्री शर्मिला शिंदे एआयच्या वापरावरून संतापली आहे. तिने पोस्ट करत लिहिलं आहे, “कृपया एआयचा वापर टाळा आणि हाडा मांसाचे कलाकार कास्ट करा. एआयला फार प्रोत्साहन देऊ नका. कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर एक सारखे दिसणारे कलाकार सापडतील. मी ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा सिनेमा बघितला नाहीये पण कौतुक ऐकलंय की बाबूजींच्या सिनेमामधल्या भूतकाळ आणि वर्तमानातल्या भूमिकांसाठी सुनील बर्वे व आदिश वैद्य यांचं कास्टिंग अगदी चपखल बसलंय.”

ही पोस्ट शेअर करत शर्मिलाने लिहिलं आहे, “एखाद्या पात्राच तारुण्य किंवा वृद्धावस्था दाखवायला एआय कशाला हवंय. कला आणि कलाकार अजून जिवंत आहेत. काही विशेष किंवा अपरिहार्य परिस्थितीमध्ये गर्जेपुर्ता आणि मर्यादित वापर हा तंत्रज्ञानाचा योग्य वापर म्हणून समजला जाऊ शकतो. ” याशिवाय शर्मिलाने स्वतःची पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

शर्मिलाचं हे मत अनेकांना पटलं आहे. “बरोबर बोललीस”, “बेरोजगारीचं नवं नाव एआय असंच दिसतंय भविष्यात”, “सहमत”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, शर्मिलाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तिचं ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत दुर्गा पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. तसंच या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय शर्मिला लवकरच ‘लाईफ लाईन’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासह जयंत वाडकर, हेमांगी कवी, माधव अभ्यंकर, भरत दाभोळकर, संध्या कुटे झळकणार आहेत.