नागरी सुविधांसाठी ‘व्हॉट्सअॅप आणि ‘वेब चॅटबॉट’ सेवा उपयुक्त ठरेल – आयुक्त शेखर सिंह

0
181

पिंपरी दि. १२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांच्या वतीने “व्हॉट्सअॅप” आणि “वेब चॅटबॉट” प्रणालीचा वापर करून नागरिकांच्या विविध सेवासंबंधीच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार असून चॅटबॉट सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. चॅटबॉट सुविधा नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या 40 व्या वर्धापनदिनानिमीत्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे नागरी सुविधांसाठी “वॉट्स अॅप” आणि “वेब चॅटबॉट” सेवेचा शुभारंभ आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, उल्हास जगताप, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, उपायुक्त विठठल जोशी, उपायुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, बाळासाहेब खांडेकर, वामन नेमाणे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, उज्ज्वला गोडसे, दिपक पवार, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंझुर्डे, प्रकल्प संचालक अविनाश पाटील, प्रकल्प व्यवस्थापक अमोल वानखेडे, प्रशांत परसाई यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव व मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्या पुढाकाराने “चॅटबॉट” व “व्हॉटसऍप चॅट” प्रणाली विकसीत करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लि. च्या वतीने इंटीग्रेटेड जीआयएस एनॅबल्ड ईआरपी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अंतर्गत जीआयएस, एसएपी एस फोर एचएएनएन आणि डिजिटल वर्कफ्लो मॅनेजमेंट चे सदर प्रणालीमध्ये इंटीग्रेशन करण्यात येत आहे. “चॅटबॉट” या प्रकल्पाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. महानगरपालिकेमार्फत सारथी हेल्पलाईन द्वारे नागरिकांमार्फत वारंवार विचारण्यात येणा-या प्रश्नांसंबंधी हेल्पलाईनद्वारे उत्तरे उपलब्ध करून देणेचा प्रयत्न केलेला आहे. सद्यस्थितीत मोबाईल व टेक्नॉलॉजी मध्ये झालेल्या बदलांचा विचार करून महानगरपालिकेद्वारे वॉट्स अॅप चॅटबॉट सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सद्यस्थितीत मिळकतकर, पाणी पुरवठा, बांधकाम परवानगी, नागरवस्ती विकास योजना, नगररचना इत्यादी विभागांसह विविध 23 विभागांचा समावेश चॅटबॉट प्रणालीमध्ये करण्यात आलेला आहे.

चॅटबॉट ही एक संगणक प्रणाली असून त्या माध्यमातून नागरिकांच्या लिखित आणि बोललेल्या संवादाचे विश्लेषण करण्यात येते. नागरिकांना प्रत्यक्ष मनुष्याशी संवाद साधल्यानंतर ज्या पद्धतीने उत्तर मिळते त्याच पद्धतीने सदर संगणक प्रणालीद्वारे उत्तर मिळते. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने एफएक्यू (सामान्य प्रश्न) आधारित संकेतस्थळाच्या माध्यमातून चॅटबॉट सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर चॅटबॉट विंडो महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महानगरपालिकेमार्फत अद्ययावत तंत्रज्ञानाचा योग्य पध्दतीने उपयोग करून नागरिकांना वेळोवेळी उत्तमोत्तम सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा नेहमीच प्रयत्न करण्यात येतो. त्यामध्ये महानगरपालिकेचे अद्ययावत संकेतस्थळ, स्मार्ट सारथी मोबाईल अॅप आणि सारथी हेल्पलाईन इत्यादींचा समावेश होतो. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नागरिकांकरीता वॉट्स अॅप आणि वेब चॅटबॉट प्रणाली सुरु करण्यात आली आहे. चॅटबॉटचा वापर करून नागरिकांना विविध सेवांसंबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी नव्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

असा घ्या सुविधेचा लाभ…
वेब चॅटबॉट सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी प्रथमत: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेबसाईट वर जाऊन ‍(pcmcindia.gov.in) या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर, चॅटबॉट लोगो वर क्लिक करून भाषा निवडावी. ‘विभागाशी संबंधित प्रश्न’ या टॅबवर क्लिक करून ज्या विभागाशी संबंधित माहिती हवी आहे, तो विभाग निवडावयाचा आहे. तसेच व्हॉटस ऍप चॅट सुविधेचा लाभ घेण्यासाठी सारथी मोबाईल क्रमांक (८८८८००६६६६) आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून मेन बटन वर क्लिक करावे.