पिंपरी , दि,४ (पीसीबी) – शहरातील भटक्या कुत्र्यांबद्दल नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती कमी करणे, श्वानांप्रती माणसांमध्ये आत्मीयता निर्माण करणे तसेच नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिका आणि पीपल्स फॉर अॅनिमल्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नेहरूनगर येथे 12 नोव्हेंबर 2022 रोजी ‘अॅनिमल कनेक्ट कॅम्प’ आयोजित केला आहे. नागरिकांनी या कॅम्प मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन निसर्ग, मानव आणि पशुपक्षी यांच्यातील नाते दृढ करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलावे, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाचे उपआयुक्त सचिन ढोले यांनी केले आहे.
पूर्वी जेव्हा माणूस निसर्गात रमत होता तेव्हा त्याच्यात आणि प्राणीमात्रांमध्ये जिव्हाळ्याचे नाते होते. हळूहळू शहरीकरण झाले. शहरातील वास्तव्यास असणाऱ्या माणसांचे जीवनमान बदलले. निसर्ग, मानव आणि पशुपक्षी यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. सध्या कुत्र्यांबद्दल नागरिकांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झालेली असते. परंतु, या प्राण्याचे जीवन हे मानवांवर अवलंबून असते ही गोष्ट आपण समजून घेऊन ती स्विकारणे गरजेचे आहे. प्रत्येक भटका कुत्रा हा हिंसक नसून त्यालाही माणसांबद्दल चांगली भावना असते. हे समजून घेणे आवश्यक आहे. निसर्ग, मानव आणि पशुपक्षी यांच्यातील दुरावलेले नाते पुन्हा दृढ करण्यासाठी ‘अॅनिमल कनेक्ट कॅम्प’ मधून प्रयत्न केला जाणार आहे. भटक्या कुत्र्यांबद्दल नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती कमी करणे, नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा यामागील उद्देश आहे.
नेहरूनगर येथील महापालिकेच्या डॉग शेल्टर हाऊस मध्ये होणाऱ्या ‘अॅनिमल कनेक्ट कॅम्प’ ची थीम ’लर्न, प्ले अँड कनेक्ट’ यावर आधारित असणार आहे. भटक्या कुत्र्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी या शिबिरात विविध विषयांवर संवादात्मक माहिती दिली जाणार आहे. यावेळी प्राण्यांचे कायदेशीर हक्क यावर चर्चा होणार असून प्रथमोपचार कसा करावा याबाबत माहिती सांगितली जाणार आहे. विशेष सक्षम कुत्र्यांसाठी डॉग थेरपी देखील देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी ‘अॅनिमल कनेक्ट कॅम्प’ या अभिनव उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे उपआयुक्त ढोले यांनी केले आहे.
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागांतर्गत नेहरूनगर येथे प्राणी सुश्रुषा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या ठिकाणी भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. भटक्या श्वानांसाठी प्रशस्त व सुविधायुक्त आंतररुग्ण विभाग असून अनेक भटक्या कुत्र्यांवर येथे उपचार केले जातात. याठिकाणी पाळीव प्राण्यांसाठी सुसज्ज बाह्यरुग्ण विभाग आहे. सोनोग्राफी सुविधा,एक्स-रे सुविधा, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी आधुनिक व सुविधा युक्त दालन याठिकाणी आहे. नागरिकांसाठी श्वान मनुष्य संघर्ष जनजागृती कक्ष उपलब्ध आहे. नागरिकांचे तक्रार निवारण साठी कक्ष देखील उभारण्यात आला आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी दिली.