नागरिकांनो, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हा; आयुक्तांचे आवाहन..

0
235

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – आपल्या देशाप्रती प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत “हर घर तिरंगा” या उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी शहरवासियांना केले. तसेच, महापालिका प्रशासनाने काटेकोरपणे या उपक्रमाची अंमलबजावणी करावी, असे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये “हर घर तिरंगा” या उपक्रमाबाबत आज नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता संजय खाबडे, उपआयुक्त अजय चारठाणकर, संदीप खोत, मनोज लोणकर, चंद्रकांत इंदलकर, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, विजयकुमार थोरात, सिताराम बहुरे, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, वामन नेमाणे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, उपमुख्य लेखाधिकारी प्रदीप बाराथे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते.

 भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी जनमानसात राहावी, या उददेशाने आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीसाठी केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रत्येक नागरिकांच्या घरांवर तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापना, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी जाणीव जागृती कार्यक्रमाचे नियोजन आणि सर्वंकष चर्चा आज झालेल्या बैठकीत करण्यात आली.

या बैठकीत मार्गदर्शन करताना आयुक्त पाटील म्हणाले, “हर घर तिरंगा” उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून लोकसहभाग वाढवावा, विविध कार्यक्रमांचे आयोजन करून समाजातील प्रत्येक घटकाचा यामध्ये समावेश करून घ्यावा, वृक्षारोपण, स्वच्छाग्रह मोहिम, प्लॉगेथॉन, शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले कार्यक्रम, समाजातील विविध स्तरातील व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण, मनपा इमारतीवर विद्युत रोषणाई अशा विविध प्रकारे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी यावेळी दिले.

 “हर घर तिरंगा” अभियानात ध्वज उपलब्ध करण्यासाठी नियोजन करावे, सामान्य नागरिकांना ध्वज खरेदी करण्यासाठी ठराविक ठिकाणे निश्चित करून त्याची माहिती नागरिकांना द्यावी, अभियानाची व्यापकपणे प्रचार प्रसिध्दी करावी, अशा सूचनाही आयुक्त पाटील यांनी बैठकीत दिल्या. शाळा महाविद्यालये, स्वयंसहायता गट यांनी स्वयंस्फुर्तीने तिरंगा वॉलेंटीयर्स म्हणून काम करावे, नागरिकांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहनही आयुक्त पाटील यांनी यावेळी केले.