नागरिकांची लाखो रुपयांची गुंतवलेली रक्कम घेऊन कंपनीचे संचालक पसार

0
287

चिंचवड दि. ५ (पीसीबी) – एका व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपये गुंतवणूक करण्यास सांगून पाच वर्षानंतर 21 लाख 25 हजार रुपये मिळणार असल्याचे आमिष दाखवले. त्यानुसार त्या व्यक्तीने आणि अन्य लोकांनी सॉईल प्रॉपर्टीज अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीत पैसे गुंतवले. गुंतवणूक केलेली व्यक्ती पैसे मागण्यासाठी कंपनीच्या ऑफिसमध्ये गेली असता त्यांची फसवणूक करून कंपनीचे संचालक कार्यालय कायमचे बंद करून निघून गेले असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार जानेवारी 2020 ते 4 जून 2022 या कालावधीत तपस्वी प्लाझा चिंचवड येथे घडला.

सॉईल प्रॉपर्टीज अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनी आणि तिचे संचालक शिवाजी किसन जाधव (वय अंदाजे 55, रा. रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय नागनाथ जाधव (वय 49, रा. पिंपळे निलख) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी जाधव यांनी त्यांच्या सॉईल प्रॉपर्टीज अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीत दरमहा 25 हजार रुपये गुंतवणूक केली असता पाच वर्षांनी 21 लाख 25 हजार रुपये मिळतील असे फिर्यादी संजय जाधव यांना आमिष दाखवले. फिर्यादी यांनी दरमहा 25 हजार रुपये गुंतवणूक केली. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर फिर्यादी पैसे मागण्यासाठी सॉईल प्रॉपर्टीज अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयात गेले. त्यांना वेळोवेळी पुढील तारखा देऊन त्यांनी गुंतवणूक केलेले मूळ प्रमाणपत्र कंपनीने जमा करून घेतले. त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा न देता आरोपी कंपनीचे कार्यालय कायमचे बंद करून फिर्यादी आणि अन्य गुंतवणूकदारांची फसवणूक करून निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.