दि.८(पीसीबी) – “महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच राष्ट्रवादीचा ध्यास”, याच विचारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं येत्या १९ सप्टेंबर, २०२५ रोजी, नागपूर येथे भव्य अशा ‘राष्ट्रवादी चिंतन शिबिरा’चं आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरात युवक, महिला, शेतकरी, कामगार वर्ग यांचे प्रश्न केंद्रस्थानी राहणार आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण, रोजगार, महिला सुरक्षा, आत्मनिर्भरता, शेतकऱ्यांचे प्रश्न, संघटनात्मक बळकटीकरण आणि राज्याच्या सर्वांगीण विकासावर शिबिरात सखोल चर्चा होणार आहे.
हे केवळ शिबिर नाही, तर शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर आधारित प्रगत महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार आहे. जनतेच्या हितासाठी ठोस उपाययोजना आखण्याचा आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न यातून होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत भक्कमपणे उभा राहून भविष्याचा नवा अध्याय लिहिणार आहे.
लक्षात ठेवा, १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये आपल्या सर्वांना एकत्र जमायचं आहे. आपल्या एकीतून, समन्वयातून जनकल्याणाच्या कार्याची पुढची दिशा ठरवायची आहे.












































