दि.२९(पीसीबी)-शेतकरी कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला विराट मोर्चा आज नागपुरात दाखल झाला आहे. या मोर्चामुळे नागपूर-वर्धा आणि नागपूर-जबलपूर महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले असून शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात फोनवरून वाद निर्माण झाला. बच्चू कडूंनी स्पष्ट केले की, “आम्ही मोर्चा सुरू असताना मुंबईतील बैठकीला येऊ शकत नाही. नागपूरमध्ये बैठक घ्या. आमचा आंदोलन मोडण्याचा कोणताही प्रयत्न स्वीकार्य नाही.”
तर दुसरीकडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, “मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. बच्चू कडूंनी किंवा किमान प्रतिनिधी पाठवला असता, चर्चा होऊ शकली असती. आम्ही कोणावरही अटक करण्यासाठी नाही, फक्त बैठकीसाठी बोलावलं.”
सध्या बच्चू कडू आणि आंदोलक शेतकरी नागपूरमध्ये आपली भूमिका ठाम ठेवत आहेत, तर सरकार आणि भाजप मुंबईतील बैठकीसाठी आग्रह धरत आहेत. त्यामुळे या आंदोलनाचा तोडगा कधी आणि कसा निघणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे.











































