नागपूरची घटना हा घटना पूर्वनियोजित – एकनाथ शिंदे

0
3

नागपूर दि. १८ (पीसीबी) – औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठी झालेल्या आंदोलनाला वेगळं वळण लागलं अन् १७ मार्च रोजी रात्री नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून पोलीस आणि इतर काही नागरिक जखमी झाले आहे. दरम्यान, ही घटना पूर्वनियोजित होती, असा संशय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.

शिंदे पुढे म्हणाले की, नागपुरातील दंगल पूर्वनियोजित कट होता, असं वाटतंय. या भागात दररोज १००-१५० दुचाकी पार्क होत होत्या. मात्र तिथे काल एकही गाडी पार्क नव्हती. इतर दुचाकी आणि चारचाकी जाळून टाकल्या गेल्या. मोठ्या प्रमाणात दगडफेक केली, हॉस्पिटलला लक्ष्य केलं. पाच वर्षीय मुलगी बालंबाल बचावली. त्या रुग्णालयातील देवदेवतांचे फोटो जाळले. फायर ब्रिगेडची गाडी जाळली, पोलिसांवर हल्ला केला.समाजकंटकांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. हल्ला करून त्यांना जखमी करणं अत्यंत दुर्दैवी बाब आहे. समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.