नागपुरात राजकारण चिघळलं, गाडीवर दगडफेक, अनिल देशमुख जखमी

0
56

नागपूर, दि. १९ – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालाय. नरखेड येथील शेवटची प्रचारसभा आटोपून ते काटोलच्या दिशेला जात होते. या दरम्यान काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाले आहेत. अनिल देशमुख यांच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर अनिल देशमुख यांना उपचारासाठी नागपुरातील मॅक्स हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आहे. तर दुसरीकडे काटोल पोलीस ठाण्याबाहेर अनिल देशमुखांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. अनिल देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी काटोल पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या मांडला आहे. अनिल देशमुखांवर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी या घटनेवर निषेध नोंदवला आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतरचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ ट्विट करत भूमिका मांडली आहे. “प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. ‌ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध”, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.