नवी मुंबईत राष्ट्रवादीलाही पडणार खिंडार, शिंदे गटाचे कुरघोडीचे राजकारण

0
260

नवी मुंबई, दि. १३ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबईतील सुमारे अर्धा डझन नगरसेवक राष्ट्रवादीला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. सर्वजण एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असून येत्या काळात अन्य पदाधिकारीदेखील राष्ट्रवादी सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अडीच महिन्यांपूर्वी शिवसेनेतील तब्बल चाळीस आमदार सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत जात मुख्यमंत्रीपद मिळविले. राज्यातील या सत्तापालटानंतर भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदे गटाची राजकीय हवा निर्माण झाली. त्यामुळे मुंबई, ठाणे, डोंबिवलीसह राज्यात विविध जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते व नेत्यांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. मात्र, नवी मुंबईतील नगरसेवकांच्या रूपाने राष्ट्रवादीतील नगरसेवक प्रथमच शिंदे गटात येत आहेत.शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला हा धक्का दिल्याचे मानले जात आहे.

पहिल्या टप्प्यात सहा नगरसेवक आले असले तरी येत्या काही दिवसात आणखी नगरसेवक व पक्ष संघटनेतील पदाधिकारी राष्ट्रवादीला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी ताकद होती. मात्र, नव्या मुंबईतील मातब्बर नेते गणेश नाईक यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी कमी झाली आहे. यातूनही नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी आणखी क्षीण होणार आहे.

येत्या काही महिन्यात राज्यातील जिल्हा परिषदा व महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. नवी मुंबई महापालिकेची लांबलेली निवडणूदेखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून मोठ्याप्रमाणात ‘आऊटगोईंग’ सुरू झाले तर निवडणुकीत पक्षाची स्थिती आणखी अडचणीची होण्याची शकयता आहे.राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिंदे गट व भाजपात ‘इनकमिंग’ सुरू झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी विविध पक्षातून पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपा व शिंदे गटात सामील होत आहेत.