नवीन मंजूर पोलीस ठाण्यांना अधिकाऱ्यांची नियुक्ती

0
126

चिंचवड, दि. 14 (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नव्याने कार्यान्वित झालेल्या पोलिस ठाण्यांसाठी पोलिस निरीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आली. अनिल विभुते (बावधन), राजेंद्र बहिरट (काळेवाडी), नीलेश वाघमारे (दापोडी), गोरख कुंभार (संत तुकारामनगर) या पोलिस निरीक्षकांची नवीन पोलिस ठाण्यांसाठी नियुक्ती झाली.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या प्रयत्नांमुळे पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी चिखली येथे नऊ एकर जागा उपलब्ध झाली. या जागेवर आयुक्तालयासाठी बांधण्यात येणारी अव्दितीय व अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज वर्तुळाकार इमारतीचे मंजूर संकल्पचित्र ‘वाॅक थ्रू’ व्हिडिओव्दारे सादर केले. यासह नव्याने मंजुरी मिळालेले चार पोलिस ठाणे तसेच सायबर पोलिस ठाण्याचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उदघाटन व लोकार्पण झाले.

नव्याने मंजूर संत तुकाराम नगर, दापोडी, काळेवाडी, बावधन तसेच सायबर पोलिस ठाण्याचे ऑनलाइन उद्घाटन झाले. गुन्हेगार तसेच नाकाबंदी, गस्त इत्यादीवर परिणामकारक देखरेख ठेवण्याकरिता ‘एआय’चा वापर करून तयार केलेल्या ‘पीसी-सीटी शिल्ड’ या ॲपचेही लोकार्पण झाले. पुणे शहर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सोहळा झाला. पोलिस महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) संजयकुमार वर्मा, पोलिस आयुक्‍त विनय कुमार चौबे, सह आयुक्‍त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, विशाल गायकवाड, स्वप्ना गोरे, बापू बांगर, डॉ. शिवाजी पवार उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाची इमारत देशातील सर्वात आधुनिक इमारत असणार आहे. केवळ पिंपरी-चिंचवड नव्हे तर राज्य पोलिस दलासाठी ही अभिमानाची बाब ठरणार आहे.

गुन्हे शाखेंतर्गत बदल्या

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेंतर्गत देखील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. पोलिस निरीक्षक शैलेंद्र गायकवाड यांची गुन्हे शाखा युनिट ३ येथून गुन्हे शाखा युनिट २ तर पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांची गुन्हे शाखा युनिट २ येथून गुन्हे शाखा युनिट ३ येथे बदली झाली. पिंपरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुहास आव्हाड यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली