नवीन थेरगाव रुग्णालयात पहिली युरोलॉजी शस्त्रक्रिया यशस्वी!

0
2

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान

दि. २९(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात युरोलॉजी विभागातील पहिली मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. ६४ वर्षीय रुग्णास मूत्रपिंडात अनेक गाठी असल्यामुळे दाखल करण्यात आले होते. या रुग्णास मधुमेहजन्य आम्लता (डायबेटिक केटोअ‍ॅसिडोसिस), डाव्या हृदयपिंडाच्या स्नायूंची वाढ (लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी) व डायस्टॉलिक डिसफंक्शन अशा गुंतागुंतीच्या तक्रारीही होत्या.

शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची तब्येत स्थिर ठेवण्यासाठी अ‍ॅनेस्थेशिया व मेडिसिनविभागाने समन्वय साधून आवश्यक ती पूर्वतयारी केली. या शस्त्रक्रियेसाठी जनरल अ‍ॅनेस्थेशिया देण्याची जबाबदारी डॉ. अर्चना गांधी, डॉ. पूजा कुलकर्णी, डॉ. पूनम माने व डॉ. अर्जित रेपुरिया यांनी सांभाळली. शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण, श्वसन-रक्ताभिसरण संतुलन तसेच शस्त्रक्रियेतील स्थिती यांचा विशेष विचार करून काटेकोर व्यवस्थापन करण्यात आले.

शस्त्रक्रिया युरोसर्जन डॉ. सुनील पालवे आणि डॉ. हनुमंत फड यांनी कौशल्यपूर्णरीत्या पूर्ण केली. मूत्रपिंडाच्या वरच्या व खालच्या भागाला लागून असलेली तब्बल १० x १० सें.मी. आकाराची गाठ यशस्वीरीत्या काढण्यात आली. संपूर्ण शस्त्रक्रिया कोणतीही गुंतागुंत न होता सुरळीतपणे पूर्ण झाली. ही शस्त्रक्रिया आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्या नेतृत्वात पार पडली. यावेळी रुग्णालयप्रमुख डॉ. राजेंद्र फिरके व डॉ. संजय सोनेकर तसेच ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ व परिचारिका टीमचे योगदान मोलाचे ठरले.

नवीन थेरगाव रुग्णालयात युरोलॉजी विभागातील पहिली मोठी शस्त्रक्रिया यशस्वी होणे ही पिंपरी चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागासाठी अभिमानाची बाब आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना उत्तम उपचार सेवा स्थानिक पातळीवर मिळण्यास मदत होत आहे.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

युरोलॉजी विभागात झालेल्या शस्त्रक्रियेत अ‍ॅनेस्थेशिया, मेडिसिन, युरोलॉजी तसेच नर्सिंग अशा सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करून उत्कृष्ट समन्वय साधला. त्यामुळेच ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करणे शक्य झाले झाले.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका