नवीन आढळणा-या मालमत्तांसाठी कर आकारणीची कार्यपध्दती जाहीर

0
91
  • सर्वेक्षणामुळे अचूक माहिती अन् करयाेग्य मूल्य निश्चित केले जाणार

पिंपरी, दि. १९ – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक ड्राेनच्या माध्यमातून शहरातील नवीन, वाढीव आणि वापरात बदल झालेल्या अशा मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणामुळे मालमत्तांची अचूक माहिती आणि करयाेग्य मूल्य निश्चित केले जाणार आहे. नव्याने आढळणा-या मालमत्तांसाठी पालिकेच्या वतीने कर आकारणीची कार्यपध्दती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या सहा वर्षांपासून मालमत्ताधारकांना कराची आकारणी केली जाणार आहे. मात्र, मालमत्ता कधी उभारली, याची याेग्य कागदपत्रे सादर केल्यास तेव्हापासूनच कराची आकारणी केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत इमारत व जमिनीवर मालमत्ता कराची आकारणी व वसुली कार्यवाही करण्यात येते. त्यानुसार शहरातील कर कक्षेत नसलेल्या मालमत्तांना कर कक्षेत आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा. लि. कंपनी मार्फत ड्राेनच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात नविन, वाढीव, वापरात बदल अशा मालमत्ता आढळणार आहेत. या मालमत्तांसाठी कर आकारणीची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. आढळलेल्या इमारत, माेकळ्या जमीन यांना सुलभ व सलग क्रमांक देण्यात येणार आहेत. सर्व मालमत्तांची अंतर्गत बिनचूक मोजमाप हाेणार आहे. मालमत्तेचे चटई क्षेत्र (कारपेट) घेण्यात येणार असून त्यावर 20 टक्के बिल्टअप आकारले जाणार आहे.

        मालमत्तेची मोजमापे चौरस मीटर पद्धतीने हाेणार आहे. कर आकारणीसाठी मालमत्तेचा बांधकाम दर्जा, वापर, क्षेत्रफळ विचारात घेण्यात येणार आहे. तसेच मालमत्ता अधिकृत किंवा अनधिकृत आहे, याचीही माहिती घेतली जाणार आहे. सामान्य करातील सवलतीच्या माहितीचे संकलन, मालमत्तांची विवरणपत्रात माहिती भरून घेण्यात येणार आहे. विवरण पत्रावर मालमत्तेमध्ये उपस्थित असलेल्या मालक, भोगवटादार, प्रतिनिधी यांची स्वाक्षरी घ्यावयाची आहे. तसेच स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यास तसे नमूद केले जाणार आहे.  

मालमत्तेचे असे हाेणार करयोग्य मुल्यांकन –
सर्वेक्षणात आढळलेल्या नवीन मालमत्तांचे कर आकारणीसाठी मालकी हक्क, बांधकाम पूर्णत्व, भोगवटा या संबंधीची कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास संबंधित मालमत्तेचे मालक, भोगवटादारांना महापालिका अधिनियमाप्रमाणे कागदपत्रे मागणीपत्र द्यावयाचे आहे. आकारणी न झालेल्या नविन, वाढीव, वापर बदल मालमत्तांचे करयोग्य निश्चिती करण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या दरपत्रकानुसार बांधकाम दर्जा, क्षेत्रफळ, वापर, बांधकाम प्रकार विचारात घेऊन मालमत्तेच्या करयोग्य मुल्याचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. ज्या मालमत्तावर यापूर्वी आकारणी झाली आहे. त्यांच्या करयोग्य मुल्यात कोणताही बदल हाेणार नाही. कर आकारणीसाठी बांधकाम कधी झाले याबाबत सबळ पुराव्याची कागदपत्रांचे ग्राह्य धरली जाणार आहेत. कागदपत्रे उपलब्ध झाली नसल्यास नियमानुसार जास्तीत जास्त 6 वर्षे मागे जाऊन कर आकारणी केली जाणार आहे. मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत कागदपत्रानुसार मालक, भोगवटादार यांचे नाव नोंदवावे. मात्र कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास सद्यस्थितीत भोगवटा करीत असलेल्या भोगवटादाराच्या “धारक” नावाने आकारणी केली जाणार आहे. मालमत्ता कर आकारणीची विशेष नोटीस, तसेच मोठ्या निवासी मालमत्तेस फलोरेज कर नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतर करयोग्य मूल्य विभागीय कार्यालय स्तरावर निश्चित करून कर आकारणीची विशेष नोटीस तयार केली जाणार आहे.

साेशल मिडियाचा प्रभावी वापर –
कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने गेल्या दाेन अडीच वर्षांपासून साेशल मिडियाचा अत्यंत प्रभावी वापर करण्यात येत आहे. त्यामुळे कर सवलती असाे किंवा कर भरण्याचे आवाहन असाे, यासाठी साेशल मिडियाच्या सर्वच प्लॅटफाॅर्मचा सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांची टीम खुबीने वापर करत आहे. त्यांना अतिरीक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांचे चांगले प्रोत्साहन आणि भक्कम पाठिंबा मिळत आहे. मालमत्तेचे मालक, भोगवटादार यांना करयोग्य मुल्य निश्चितीसाठी विशेष नोटीस बजाविण्यात येत आहे. ही नाेटीस ई-मेल, एसएमएस किंवा व्हाटॅसअँप या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मालमत्ता धारकास नाेटीस देण्यात येणार आहे. विशेष नाेटीसवर क्यूआर काेड देण्यात येत आहे. हा काेड स्कॅन केल्यानंतर मालमत्ता धारकांना मालमत्तेचा नकाशा, विवरण, मुल्यांकन, देय बिलाची रक्कम याचा तपशील उपलब्ध हाेणार आहे.

मालमत्ता करयोग्य मूल्य निश्चिती कार्यवाही –
मालमत्तेचा मालक, भोगवटादारास लेखी आणि ऑनलाईन हरकत घेता येणार आहे. यासाठी मे. स्थापत्य कन्सल्टंट यांनी मालमत्ता कराच्या साॅफ्टवेअरमध्ये माहिती संकलित करणार आहे. विशेष नोटीसवरील क्यूआर काेड स्कॅन केल्यावर मालमत्ताधारकास मालमत्तेचे विवरण दिसणार आहे. यानंतर हरकत घ्यायाची असल्यास त्यामध्ये आँनलाइन हरकत घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मालमत्ताधारकास मालमत्तेचा तपशील पाहून आकारणी योग्य किंवा अयोग्य याबाबतची खातरजमा करणे, विशेष नोटीसवर हरकत घेण्यासाठी मोबाईलवर ओटीपी बेस सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कर विशेष नोटीसवर ऑनलाईन पद्धतीने किंवा कार्यालयात लेखी हरकत दाखल झाल्यावर, हरकती वर बाजू मांडण्यासाठी सुनावणी घेण्यात येणार आहे. नव्याने आढळणा-या मालमत्तांची संख्या माेठी असल्याने सुनावणी घेण्यासाठी प्रशासन अधिकारी यांच्याबरोबरच सहाय्यक मंडलाधिकारी यांची आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नियुक्ती केली आहे. मालमत्ता कर आकारणी विशेष नोटीसवर सुनावणी झाल्यानंतर आवश्यकतेनुसार स्थळ पाहणी करून करयाेग्य मूल्य निश्चित केले जाणार आहे. मालमत्ता धारकास विशेष नोटीस मधील आकारणी मान्य असल्यास लेखी पत्राद्वारे किंवा ऑनलाईन पद्धतीने संमती देता येईल. त्यानंतर अशा मालमत्ता धारकास करयोग्य मुल्य निश्चिती आदेशाची विशेष नाेटीस दाेन समक्ष, अथवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. मालमत्ताधारकास नोटीसवर हरकत, करयोग्य मूल्य निश्चिती आदेश, मालमत्ता कर बिल, कर भरणा इत्यादी मालमत्ता कराच्या अनुषंगाने सुविधेचा लाभ घेता येईल. मालमत्तांचे करयोग्य मुल्य निश्चित झाल्यास विशेष नाेटीस 2 आणि 3 या सर्वाची असेसमेंट रजिस्टरला नोंद ठेवून हे रजिस्टर ऑनलाईन ठेवण्यात येणार आहे. मालमत्तेचे करयोग्य मुल्य निश्चित झाल्यानंतर मालमत्ताधारकास बिल समक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली