नवले पूलावरील दोन कंटेनरची; धडक, तीन ठार

0
562

पुणे,दि.१७(पीसीबी) – नवले पुलावर स्वामीनारायण मंदिरजावळल दोन कंटेनरची जोरदार धडक झाली आणि त्यांनी पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू झाला.
या दोन्ही कंटेनरला लागलेली आग विझवण्यात अग्नीशमन दलाला तासाभराने यश आले. या घटनेमध्ये तीन जण मृत्यूमुखी पडले आहेत.

पुण्यातील नवले पुलावर अपघाताचं सत्र सुरूच असून पुन्हा एकदा हा जीवघेणा अपघात झाला आहे. पुणे-बेंगलोर हायवेवर असलेल्या या पुलावर दोन कंटेनरची एकमेकांना धडक बसली. जोरदार बसलेल्या या धडकेनंतर एका कंटेनरने पेट घेतला. त्या कंटेनरमधील केबिनमध्ये बसून काहीजण प्रवास करत होते. त्यामध्ये काही महिला आणि लहान मुलेही होती. त्यांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये अनेकजण जखमीदेखील झाले आहेत.

अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये होरपळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही आग अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली आहे.

नवले पूल हा किती धोकादायक आहे हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या पुलाची रचना चुकीची असल्याचं अनेकांनी वेळोवेळी निदर्शनास आणली आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने यावर कोणतीही कारवाई केली नाही.

पुण्यातील नवले पूल हा अपघातांसाठी बदनाम झाला आहे. या पुलावर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.

आतापर्यंत 70 हून अधिक बळी
सन 2014 पासून आतापर्यंत दरी पूल ते नवले पूल आणि धायरी पूल या साडे तीन किलोमीटरच्या अंतरात तब्बल 186 अपघात झाले आहेत. या अपघातांमधे आतापर्यंत 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 145 हून अधिक जण जखमी झाले आहेत