नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेत संतोष गाढवे प्रथम

0
287

पिंपरी, दि.२१(पीसीबी) – नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित एकोणतिसाव्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यस्पर्धेत संतोष गाढवे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. संत ज्ञानेश्वर उद्यान, पेठ क्रमांक २८, आकुर्डी प्राधिकरण येथे शनिवार, दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न झालेल्या या काव्यसोहळ्यात ह.भ.प. किसनमहाराज चौधरी, माजी उपमहापौर शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र घावटे, सचिव माधुरी ओक, संचालक नंदकुमार मुरडे, ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी यांची व्यासपीठावर तसेच शहरातील मान्यवर साहित्यिकांची सभागृहात उपस्थिती होती. काव्यलेखन आणि सादरीकरण अशा दोन स्तरांवर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे एकोणनव्वद कवींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी सत्तावन कवींची प्रत्यक्ष सादरीकरणासाठी निवड करण्यात आली होती. तरुण कवींच्या गंभीर कविता आणि वयाने ज्येष्ठ असलेल्या कवींनी साभिनय सादर केलेल्या हलक्याफुलक्या .

कविता हे वैशिष्ट्य असलेल्या या काव्यस्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे –
संतोष गाढवे (रानभैरी) – प्रथम, अभिजित काळे (मेघावली) – द्वितीय, रेखा कुलकर्णी (श्रावण आला) – तृतीय, सुप्रिया लिमये (नाद पावसाचा) – उत्तेजनार्थ पहिला आणि अरुण कांबळे (डाव) – उत्तेजनार्थ दुसरा. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे रुपये पाचशे (प्रथम), चारशे (द्वितीय), तीनशे (तृतीय) आणि प्रत्येकी दोनशे (उत्तेजनार्थ) रोख तसेच सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक कवीला ग्रंथ, लेखणी आणि ऑनलाईन प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी, “पूर्वीच्या छंदोबद्ध कविता अजूनही रसिकांच्या मनाला मोहित करतात. कवीच्या अंतरीच्या भावभावना त्याच्या काव्यातून प्रकट होत असल्याने त्या वाचताना किंवा ऐकताना पुन:प्रत्ययाचा आनंद देतात!” असे विचार मांडले. शैलजा मोरे यांनी, “समाजात बंधुभाव निर्माण करण्याची शक्ती कवींच्या शब्दांत असते!” असे मत व्यक्त केले. सलीम शिकलगार यांनी शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ आणि ‘कथा स्वातंत्र्याची’ या ग्रंथांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राज अहेरराव यांनी आपल्या प्रास्ताविकातून नवयुग मंडळाच्या एकोणतीस वर्षांच्या कालावधीतील साहित्यिक उपक्रमांची माहिती दिली. सुहास घुमरे आणि माधुरी विधाटे यांनी काव्यस्पर्धेचे परीक्षण केले. अनिकेत गुहे, उज्ज्वला केळकर, रजनी अहेरराव, अरविंद वाडकर, चिंतामणी कुलकर्णी, शरद काणेकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. संपत शिंदे आणि अश्विनी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी ओक यांनी आभार मानले.