नवनीत राणा, अनिल बोंडेंना तडिपार करा…!

0
264

अमरावती, दि. १३ (पीसीबी) : लव्ह जिहादच्या प्रकरणावरुन गेल्या चार-पाच दिवासांपासून अमरावतीतील वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार नवनीत राणा यांनी राजापूर पोलीस ठाण्यात केलेल्या राड्यानंतर एमआयएम आक्रमक झाली आहे. शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप खासदार अनिल बोंडे व खा नवनीत राणा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी एमआयएमचे शहराध्यक्ष सलाउद्दीन शेख यांनी केली आहे.

लव्ह जिहादच्या नावाखाली अमरावती शहरात भाजप खासदार अनिल बोंडे आणि नवनीत राणा शहराचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन समाजात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करत आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लिम युवकांना तुरुंगात डांबले जात आहे, असा आरोप सलाउद्दीन शेख यांनी केला आहे.

एमआयएम चे नगरसेवक,नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आज पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांना निवेदन दिले असून खा नवनीत राणा व खा अनिल बोंडे यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्याची मागणी निवेदनात केलेली आहे. काही महिन्यांपूर्वी अमरावतीमध्ये झालेली दंगल भाजप नेते डॉ. अनिल बोंडे, प्रवीण पोटे व खासदार नवनीत राणा यांनीच भडकवली होती. मात्र त्यांच्यावर काही कारवाई केली नसल्याचा आरोप देखील एमआयएमच्या वतीने करण्यात आला आहे.

९ सप्टेंबरला खासदार नवनीत राणा यांनी १९ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार करत पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. खासदार राणांनी तर फोन रेकॉर्डिंगवरून पोलीस उपायुक्तांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जाब विचारत पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोपही केला. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेतल्यानंतर मुलीच्या जबाबामुळे नवनीत राणा तोंडघशी पडल्या. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर ती मुलगी सातारा येथे आढळून आली. पहाटे ३ वाजता तिला अमरावतीत तिच्या गावी आणण्यात आलं. राजापेठ पोलिसांनी मुलीकडून जबाब नोंदवून घेत तिला आई-वडिलांकडे सुपूर्द केलं. पण यावेळी मुलीने तिच्यासोबत कोणताही गैरप्रकार घडला नसल्याचं कबूल केलं. मी शिक्षणासाठी गेली होते. मला कोणीही जबरदस्तीने पळवून नेलं नव्हतं, माझी बदनामी थांबवा. खासदार नवनीत राणा यांनी आपल्याबद्दल खोटी माहिती दिल्याचा आरोपही यावेळी मुलीने केला.

या प्रकऱणी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनीत राणांनी माझ्या मुलावर सोहेल शहावर लव्ह जिहादचे खोटे आरोप केले. राणा यांनी समाजात आमची बदनामी केली. इतकेच नव्हे तर आमच्या कुटूंबियांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांच्यासोबतही चुकीची वर्तणूक केल्याचा आरोपही मुस्लीम मुलाचे वडील कादर शहा यांनी केलेल्या फिर्यादीत केला आहे.