नवनीत राणांचे होणार पुनर्वसन, पुन्हा संसदेत पाठवण्यासाठी आटापीटा

0
13

मुंबई,दि.11 (पीसीबी) : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. महायुती सरकार सत्तेत येऊन ५ दिवस उलटले, तरीही खातेवाटप जाहीर झालेलं नाही. खातेवाटपाच्या चर्चा सुरु असताना राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांना राज्यात मंत्री म्हणून आणण्याच्या हालचाली भाजपनं सुरु केल्या आहेत. त्यांच्या जागी नवनीत राणांना संसदेत पाठवलं जाऊ शकतं.

नवनीत राणा २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या. अमरावती मतदारसंघातून त्या अपक्ष निवडून आल्या. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्यातील भाजप नेते, कार्यकर्ते यांच्यासह महायुतीच्या नेत्यांचा विरोध असतानाही त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यांना उमेदवारी दिली गेली. पण काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला. राणा यांची भूमिका भाजपला पूरक राहिलेली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी हनुमान चालिसा पठणाचा मुद्दा गाजवला होता. त्या सातत्यानं ठाकरेंना लक्ष्य करतात. लोकसभेतील पराभवानंतर त्या संसदेत जाण्यास उत्सुक आहे. त्यांची ही मागणी लवकरच पूर्ण होऊ शकते.

अमरावतीमधील भाजपचे नेते अनिल बोंडेंनी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून काम केलं आहे. नवनीत राणा यांच्याप्रमाणेच तेदेखील आक्रमक नेते आहेत. आता या दोन आक्रमक नेत्यांना भाजप एक्स्चेंज करण्याच्या तयारीत आहे. बोडेंना दिल्लीतून राज्यात पुन्हा आणण्यात येईल. त्यांना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातही स्थान दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. बोंडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर राणा यांची वर्णी लागेल. पुढारीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.