पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी आज (गुरुवारी) आयुक्त आणि प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला. सायंकाळी पाचच्या सुमारास महापालिकेत दाखल होत त्यांनी पदभार स्वीकारला.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर उपस्थित होते. ओडिशा केडरचे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने महापालिका आयुक्तपदी 15 फेब्रुवारी 2021 मध्ये नियुक्ती झाली होती. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत विविध आक्षेप होते. त्यांचे लोकप्रतिनिधींशी खटके उडत होते. त्यामुळे अवघ्या 18 महिन्यात त्यांची बदली झाली. राज्य शासनाने पाटील यांची मंगळवारी 16 ऑगस्ट रोजी उचलबांगडी केली.
त्यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या जागी साता-याचे माजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्ती केली. नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह आज (गुरुवारी) महापालिकेत दाखल झाले. सुरुवातीला अँटी चेंबरमध्ये गेले. त्यानंतर दलनातील खुर्चीवर बसत पदभार स्वीकारला. मावळते आयुक्त राजेश पाटील हे अनुपस्थितीत होते. राजेश पाटील यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे अनुपस्थित होते. दोघेही मुंबईत असल्याचे समजते.
नवे आयुक्त शेखर सिंह यांचा ‘असा’ आहे परिचय!
शेखर सिंह हे 2012 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. देश पातळीवर त्यांचा 306 वा क्रमांक होता. नागपूरचे सहायक जिल्हाधिकारी, रामटेकचे प्रांताधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सातारा जिल्हाधिकारपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यावेळी घेतलेल्या निर्णयांबाबत ते चर्चेत राहिले. त्याबाबत त्यांचे सर्वस्थरातून कौतुकही झाले होते. सिंह हे आयआयटी गुवाहटीचे (इंडियन इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी) पदवीधर आहेत. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील बर्केली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग शाखेची पदव्यूत्तर पदवी घेतली आहे.











































