नागरिकांनी फ्रॉड ‘एसएमएस’ला बळी पडू नये; महापालिकेचे नागरिकांना आवाहन..
पिंपरी, दि. २६ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या ज्या नागरिकांची पाणीपट्टी थकीत आहे अशा मालमत्तेचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या माध्यमातून याबाबत नागरिकांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे वेळोवेळी ‘एसएमएस’ द्वारे व इतर माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. परंतू, शहरात नागरिकांचे आज रात्री 9 वाजता नळकनेक्शन तोडण्यात येईल, अशा आशयाचे एसएमएस राकेश मिश्रा, महापालिका अधिकारी या नावाने व 8009015135 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करणारा फसवणूकीचा ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहे. असे ‘एसएमएस’ हे नागरिकांची फसवणूक करणारे असून याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे. असे महापालिकेकडून आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.