नर्सला खोलीत डांबून डॉक्टरनेच केला अत्याचार

0
132


दि. २० ऑगस्ट (पीसीबी)  कोलकाता,
कोलकातामधील डॉक्टर युवतीवरील बलात्कार प्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात असतानाच देशात ठिकठिकाणी रुग्णालयातील नर्स आणि महिला डॉक्टर सुरक्षित नसल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील मनपाच्या सायन रुग्णालयात एका महिला डॉक्टरला रुग्णाने आणि त्याच्या नातेवाईकाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता उत्तर प्रदेशमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या २० वर्षीय महिलेवर रुग्णालयातील डॉक्टरांनीच बलात्कार करण्याची संतापजनक घटना घडली आहे.

पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार सदर गुन्हा रविवारी (दि. १८ ऑगस्ट) मध्यरात्री घडला. पोलिसांनी या प्रकरणी ती जणांना अटक केली आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप कुमार मीना यांनी दिली.
शनिवारी रात्री २० वर्षीय पीडिता सायंकाळी ७ वाजता रुग्णालयात आपल्या शिफ्टवर हजर झाली. याच रुग्णालयात ती मागील सात महिन्यांपासून काम करत आहे. पोलीस अधीक्षक मीना यांनी सांगितले की, रुग्णालयातील आणखी एक नर्स मेहनाझ आणि वॉर्ड बॉय जुनैद यांनी पीडितेला डॉ. शाहनवाज यांची भेट घेण्यास सांगितले. मात्र पीडितेने नकार दिल्यानंतर मेहनाझ आणि जुनैदने तिला बळजबरीने सर्वात वरच्या मजल्यावरील एका खोलीत बंद केले.

डॉ. शाहनवाजने त्यानंतर त्या खोलीत पीडितेवर बलात्कार केला आणि तिला तिथेच बंदी बनवून ठेवले. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देत जातीवरून शिवीगाळही केली, अशीही माहिती मीना यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

पोलिसांनी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार नर्स मेहनाझ, वॉर्ड बॉय जुनैद आणि डॉ. शाहनवाज यांना अटक केली आहे. आरोग्य विभागाने सदर रुग्णालयाची तपासणी केल्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीप सिंह यांच्या आदेशानंतर रुग्णालयाला टाळे ठोकले. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.