नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान जरी असले, तरी त्यांची वागणूक दारुड्यासारखी

0
255

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – देशात काँग्रेस विरुद्ध भाजपा असा सामना सुरू असताना राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सातत्याने भाजपाला लक्ष्य केलं जात आहे. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडलं आहे. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर टीका करतानाच त्यांच्या वाढदिवशी सोडण्यात आलेल्या चित्त्यांवरूनही टोला लगावला. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी ईडीवरही तोंडसुख घेतलं.

“माझं ईडीला म्हणणं आहे की..”
कोण दोषी, कोण निर्दोष हे न्यायालयाला ठरवू द्या, असं प्रकाश आंबेडकरांनी ईडीला सुनावलं. “माझं ईडीला म्हणणं आहे की, तुम्हाला कुणाला पकडायचं असेल तर पकडा. पण २ महिन्यांत त्याचा एफआयआर कोर्टात गेला पाहिजे. कोर्टाला ठरवू द्या की तुम्ही केलेला तपास खरा आहे की खोटा. पण कोणत्याही सुनावणीशिवाय किंवा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय चार-पाच महिने एखाद्याला तुरुंगात ठेवणं, याला घटना मान्यता देत नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

रिझर्व्ह बँकेच्या अहवालाचा उल्लेख
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी रिझर्व्ह बँकेने सादर केलेल्या अहवालाचा उल्लेख केला. “रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरने दोन महिन्यांपूर्वी सादर केलेला अहवाल सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी म्हटलंय की अंदाधुंद पद्धतीने तुम्ही सरकारी मालमत्ता विकत आहात. हे देशाच्या हिताचं नाही. माझ्या भाषेत सांगायचं झालं, तर दारुड्याला जर दारू पिण्यासाठी पैसे मिळाले नाहीत, तर तो घरातली भांडी विकायला सुरुवात करतो. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान जरी असले, तरी त्यांची वागणूक दारुड्यासारखी आहे. हे मी दोन वर्षांपूर्वी बोललो होतो. रिझर्व्ह बँकेने त्याला आत्ता पुष्टी दिली आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे”
दरम्यान, देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने होत असल्याचं प्रकाश आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले. “सध्या देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे. नेहरुंनी कबुतरं शांतीसाठी सोडली होती. पण नेहरूंनी त्यांच्या वाढदिवशी कबुतरं नाही सोडली. पण मोदींनी स्वत:चा वाढदिवस बघितला आणि चित्ता आणला. त्यातून सगळ्यांना चित्ता सोडण्याची भीती दाखवली. आत्तापर्यंत ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स होता. आता चित्ता आहे. या दोन वेगवेगळ्या वृत्ती आहेत”, असं आंबेडकर म्हणाले.